Dainik Maval News : आचार्य बाळशास्त्री जांभेकर ( 20 फेब्रुवारी 1812 ते 17 मे 1848 ) हे मराठी पत्रकारितेचे जनक (Father of Marathi journalism) आहेत. 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले. या निमित्त राज्यात 6 जानेवारी हा दिवस ‘दर्पण दिन’ अर्थात ‘पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर (Darpankar Balshastri Jambhekar) यांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. आज या घटनेस 190 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्या या महत कार्याची आठवण सर्वांना राहावी म्हणून प्रतिवर्षी 6 जानेवारी हा दिवस ‘पत्रकार दिन’ साजरा केला जातो.
केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण हाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेऊन आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ प्रकाशित केले. 1832 चा काळ अर्थातच इंग्रजांच्या अधिपत्याचा काळ होता. राष्ट्रभक्तीसाठी समाजास प्रबोधनाची मोठी गरज होती. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन, परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी एखादे वृत्तपत्र असावे, असे बाळशास्त्रींना वाटले आणि त्यांनी दर्पण सुरु केले. भाऊ महाजन यांच्या सहकार्याने मराठी तर स्वत: इंग्रजी मजकूराची बाजू ते ‘दर्पण’साठी सांभाळत.
- दर्पणच्या माध्यमातून शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय त्यांनी साधला. दर्पण हे इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले. 25 जून 1840 यावर्षी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पण वृत्तपत्राची निर्मितीच नव्हे तर समाजसुधारणेचे कार्यही बाळशास्त्री जांभेकरांनी केले. किंबहुना सामाजिक सुधारणेच्या बाबतीत ते आग्रही होते. समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल असे त्यांचे मत. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी समाजसुधारणा, शिक्षण आणि वृत्तपत्र प्रसार यासाठी केलेले कार्य हे अलौकिक असे आहे. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मुंबईचे तत्कालीन गर्व्हनर सर जेम्स कॉर्नोक यांनी 1840 यावर्षी जस्टीस ऑफ पीस अशी पदवी देऊन बाळशास्त्रींचा गौरव केला.
आद्य संपादक, समाजसुधारक, शिक्षणतज्ञ अशा बहूआयामी व्यक्तीमत्वाचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी त्याकाळी केलेल्या कष्टाची जाणीव निश्चितच आजची माध्यम क्रांती पाहून होते. त्यांच्या महान कार्यास कोटी कोटी प्रणाम…
राष्ट्रीय पत्रकारिता दिन –
आज (दि. 6 जानेवारी) आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला अभिवादन करत असताना हेही लक्षात घेतले पाहिजे की राष्ट्रीय पातळीवर 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारतातील पत्रकारितेची निकोप वाढ व्हावी, पत्रकारिता सुदृढ व्हावी, तिच्या संख्यात्मकते बरोबरच गुणात्मक विकास व्हावा या हेतूने केंद्र सरकारने 4 जुलै 1966 रोजी प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाची स्थापना केली. याचे विधिवत काम 16 नोव्हेंबर 1966 रोजी म्हणून हा दिवस ‘राष्ट्रीय पत्रकारिता दिन’ म्हणून साजरा केला जातो. प्रेस कौन्सिल ॲक्ट 1978 हा कायदा तयार झाला. तेव्हापासून या कायद्यांतर्गत प्रैस कौन्सिल ऑफ इंडियाचं काम सुरु आहे.
लोकशाही व्यवस्थेत स्वतंत्र आणि जबाबदारीने काम करणाऱ्या पत्रकारांचा पत्रकार दिन अथवा पत्रकारिता दिन हा सन्मानदिन असतो. हा दिवस म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांचे पालन करत माध्यमे जी महत्वपूर्ण भूमिका बजावतात त्याचे स्मरण करण्याचा आणि ते स्फुरण अंगीकृत करण्याचा दिवस असतो. सुदृढ लोकशाहीसाठी मुक्त आणि निष्पक्षपाती माध्यमांची गरज असते. अशी माध्यमे लोकशाहीची आधारस्तंभ असतात. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनापासून आजपर्यंतच्या वाटचालीत माध्यमांनी मोठी भूमिका बजावलेली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या