संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी बातमी समोर येत आहे. समृद्धी महामार्गावर आतापर्यंतचा सर्वाधिक भीषण अपघात झाला आहे. एका खासगी ट्रॅव्हल्सच्या बसच्या अपघातात तब्बल 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यापैकी 25 जणांचा अग्नीतांडवात होरपळून मृत्यू झालाय, तर 8 जणांवर उपचार सुरू आहेत. नागपूरहून पुण्याला येत असताना बुलढाणा जिल्ह्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ( Major Accident In Buldhana 25 Dead As Bus Catches Fire on Mumbai Nagpur Expressway )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
असा घडला अपघात…
सदर ट्रॅव्हल्स बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी 8 प्रवासी सुखरुप बाहेर पडले, तर 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त आणि मदत जाहीर…
बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. यामध्ये बसने पेट घेतल्यानं 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आठ लोक जखमी आहेत. मी याबाबत जिल्ह्याधिकारी तेथील पोलिस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 1, 2023
अजित पवारांकडून शोक व्यक्त…
बुलढाण्यातील घटनेवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणातील सिंदखेड राजा येथे अपघात होऊन 25 हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे, असे अजित पवार म्हणाले.
अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी आमदार सरसावले; विद्यार्थ्यांना ‘ऑफ लाईन’ पद्धतीने दाखले द्या – आमदार सुनिल शेळके
– एक रुपयात पीक विमा! योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, ‘या’ पिकांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर