आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या उपक्रमामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. ( Ganeshotsav 2023 Best Public Ganesh Mandals Will Receive An Award From Maharashtra Government )
राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. पुणे मनपा हद्दीत ३ हजार ५६५, पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत १ हजार ८१२ आणि पुणे ग्रामीण हद्दीत ३ हजार ३६० अशी जिल्ह्यात एकूण ८ हजार ७३६ सार्वजनिक गणेश मंडळे व ग्रामीण हद्दीत ३९६ एक गाव एक गणपती मंडळे आहेत. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या, स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धेत सहभाग घेता येईल.
सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड दहा निकषांच्या आधारे करण्यात येईल. १० निकषांसाठी एकूण १५० गुणांक आहेत. पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूकर सजावट, ध्वनीप्रदुषणविरहीत वातावरण, समाजप्रबोधनात्मक सजावट/देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सजावट/देखावा, मंडळामार्फत करण्यात येणारे सामाजिक कार्य, शैक्षणिक, आरोग्य आदीसंबंधी कार्य, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांचे आयोजन, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धा, गणेश भक्तांना पुरविण्यात येणाऱ्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार गुण देण्यात येणार आहेत.
शासन निर्णयातील परिशिष्टानुसार अर्जाचा नमुना पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज ऑनलाईन सादर करणे अपेक्षित आहे. ८ सप्टेंबरपूर्वी अकादमीमार्फत जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात येणार असून उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी अध्यक्ष, जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हे सदस्य असतील. अर्ज केलेल्या मंडळांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून मंडळाकडून छायाचित्रीकरण करुन तसेच कागदपत्रे जमा करून गुणांक देण्यात येतील.
पुणे जिल्ह्यातून ३ गणेशोत्सव मंडळाची निवड व शिफारस समितीमार्फत राज्य शासनाकडे करण्यात येईल. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास ५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास २ लाख ५० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास १ लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झालेल्या तीन मंडळांशिवाय अन्य गणेशोत्सव मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. ( Ganeshotsav 2023 Best Public Ganesh Mandals Will Receive An Award From Maharashtra Government )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अधिवेशनात घुमला मावळचा आव्वाज..! तालुक्यातील विविध प्रश्नांकडे आमदार शेळकेंनी वेधले सभागृहाचे लक्ष
– सावित्रीच्या लेकींनी घडवला इतिहास! दारुंब्रे शाळेचे नाव जिल्ह्यात गाजवले, आई-वडील अन् शिक्षकांच्या आनंदाला उधाण