Dainik Maval News : आपल्याकडे एकादशी, चतुर्थी, काही खास सण आणि श्रावण महिना, अधिक महिना या काळात व्रते, उद्यापने आणि उपवास केले जातात. मी फक्त “श्रावण पाळतो” असेही म्हणणारे आपल्या आवती भवती खुप जण असतात. काही सहज म्हणतात की, मी “उपास- तापास” करत नसतो. या शब्दांचा अर्थ मी धार्मिक आहे किंवा नाही या अर्थाने आपण तो वापरतो. त्यातून पुढे “मी इतके वर्ष हे सर्व केले तरी पण त्याचा काही उपयोग झाला नाही! मी आता हे सर्व करणे बंद केले आहे.” असेही आपल्यापैकी अनेकजण अभिमानाने सांगत असतात. खरेतर “उपवास” करणे ही एक साधना आहे, एक नियम आहे. तो करण्यामागील मुळ हेतू लक्षात न घेताच अनेक जण उपवास करत असतात.
आपणांस काहीतरी मिळवायचे (काम्य) आहे म्हणून उपवास-तापास करायचे? की विषयांपासून मुक्त होण्यासाठी हे करायचे हेच आपल्या लक्षात येत नाही. खरोखर आपण शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण सर्व काही करत असतो का? त्यामुळे आता उपवासाची व्याख्या शास्त्रात काय सांगितली आहे ते पाहू –
“उपावृत्तस्तु पापेभ्यो यस्तु वासो गुणैः सह।
उपवास: स विज्ञेयो न शरीरस्य शोषणम्॥”
पापांपासून मुक्त होण्यासाठी व सद्गुणयुक्त जगणे म्हणजे उपवास. फक्त शरीराचे शोषण करुन अन्नत्याग करणे म्हणजे उपवास नव्हे, अशी व्याख्या स्कंद पुराणात सांगितली आहे. तर आणखी एक व्याख्या –
“कषाय विषयारंभ त्यागो यत्र विधीयते ।
उपवास: स विज्ञेयो शेषं लंघनं विदुः ।”
अविद्येने मुळे जे दोष प्राप्त होत असतात, त्यातील प्रमुख राग, व्देष, इर्षा, मद, अहंकार, मत्सर इत्यादींचा त्याग, विषय भोगाची इच्छेचा त्याग करण्यासाठी परमतत्वाचसाठी करावयाचे व्रत उपवास आहे. हा हेतू सोडून जे केले जाते ते फक्त “लंघन” म्हणजे उपासी राहाणे असते. “कषाय” या शब्दाचा अर्थ जैन, बौध्द हिदु परंपरेने सर्वसाधारणपणे एकच सांगितला आहे. ( Fasting Importance Features And History In Hindu Culture Fasting In Shravan Month Information In Marathi )
उपवास किंवा उपास हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरले जात असले तरी त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत. “उप” म्हणजे जवळ व “वास” म्हणजे राहाणे. परमतत्वाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण्याचे साधन म्हणजे ‘उपवास’. हे सुध्दा एक ‘व्रत’ आहे. व्रत म्हणजे विशिष्ट हेतूच्या पूर्ततेसाठी करावयाची नियमबध्द कृती तर उपास म्हणजे लंघन (अन्नपाण्याचा त्याग) उपवास म्हणजे फक्त् उपासी पोटी रहाणे नाही तर एका ठराविक दिवशी मी अश्या पध्दतीने वागेन हे बंधन आपण स्वत:वर लाढून घेणे. एक नियम तयार करणे. जो पुर्णत: ऐच्छिक असतो. त्यातील एक कृती असते विशिष्ट पध्दतीचे जेवण करणे किंवा अजिबात न करणे असेही असते.
उपास किंवा उपवास म्हणजे “विशिष्ट कालावधीसाठी खाणेपिणे पूर्णपणे वर्ज्य करणे किंवा फक्त कमीत कमी अन्न घेणे”. आजकाल उपवास म्हणजे fasting (फास्टिंग) या अर्थी वापरला जातो. साबुदाणा आणि उपवास याचे जणू समीकरण झाले आहे. ‘साबुदाणा खिचडी’ उपवासाला चालते याचा शोध कोणी लावला, हेही देव जाणे, कारण कोणत्याच ग्रंथात याचा संदर्भ सापडत नाही. मुळात साबुदाणा हा नैसर्गिक नाही, तो झाडाचा रस आंबवून तयार केलेला पदार्थ आहे. साबुदाण्याचे झाडही भारतीय नाही. अफ्रिकेतील आहे. इंग्रजांनी तो पदार्थ पहिल्यांदा भारतात आणला, संताच्या एकाही अभंगामध्ये साबुदाणा हा उल्लेख नाही. तरीही आपला उपवासला चालतो म्हणून हा साबुदाणा आपण खाऊन होतो. ( Fasting Importance Features And History In Hindu Culture Fasting In Shravan Month Information In Marathi )
उपवासाचा कालावधी तो उपवास कोणत्या देवतेसाठी करण्यात येतो, त्याप्रमाणे त्याचा कालावधी निश्चित केलेला असतो. कोणत्या देवतेला कोणते अन्न उपवासाला चालते हे ही शास्त्रात नमुद केलेले आहे. तरी सुध्दा आपण सरसकट उपासाचे पदार्थ एकच म्हणून खातो. जे शास्त्र आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसते.
उपवासाचे विविध दिवस व प्रकारआहेत;
1. वाराचे उपवास – उदा. गुरुवार, शनिवार इ.
2. तिथीचा उपवास – उदा. चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा इ.
3. नैमित्तिक उपवास – उदा. महाशिवरात्री, आषाढी एकादशी, नवरात्री इ.
4. महिन्याचे महात्म असलेले उपवास – जसे श्रावणी सोमवार वगैरे.
5. नवसाचे वा काम्य उपवास – जसे की व्रत, 16 सोमवार वगैरे
साधारणपणे अशा उपवासाचा कालावधी 12 ते 24 तास इतका असतो. उपवास सोडण्यापूर्णी ‘पारणे’ केले जाते. तोही एक सोहळा असतो.
- उपवास काही दिवसांपासून, आठवडे आणि महिनेही टिकू शकतात. उपवासाच्या काळात, काही उपवासांमध्ये, सर्व खाणे आणि पेय निषिद्ध आहे. तर अनेक उपवासांमध्ये, चहा, कॉफी, पाणी आणि फळे यासारख्या काही गोष्टी खाण्यास आणि पिण्यास परवानगी आहे. उदाहरणार्थ नवरात्रीच्या उपवासात फळे आणि चहा वगैरे घेता येते, तर एकादशीचे व्रत म्हणजे निर्जला, म्हणजेच या काळात उपवास करताना काहीही खाणे किंवा प्यावे लागत नाही. या उलट आजकाल “एकादशी आणि दुप्पट खाशी” ही म्हण प्रचलित आहे. अशा या म्हणी मुळ उपवास या व्रतास बदनाम करते आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. आपणांस उपवासचा अर्थ समजला नसल्याचे या म्हणीमुळे समजते.
एकनाथ महाराजांनी आपल्या अंभगातून;
एकादशी एकादशी । ज्या छंद अहर्निशी ।।१।।
व्रत करी जो नेमानें । तया वैकुंठीचें पेणें ।।२।।
नामस्मरण जाग्रण । वाचे गायें नारायण ।।३।।
तोचि भक्त सत्य साचा । एका जानार्दन म्हणे वाचा ।।४।।
एकादशीच्या दिवशी काय करावे हे सांगितले आहे. आपण मात्र नेमके याचा विरुध्द काम करीत असतो. वेद, धर्मशास्त्र, पुराण आणि वेदांगांमध्ये व्रतांबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे. ( Fasting Importance Features And History In Hindu Culture Fasting In Shravan Month Information In Marathi )
महाराष्ट्रातील यादव काळातील हेमांद्रिपंत यानी या विषयी अनेक ग्रंथ लिहीले आहेत. हेमाद्रि व्रत खंडात या विषयी विस्तृत विवेचन केले आहे. विश्वनाथ शर्मा लिखित “श्री व्रतराज” या ग्रंथात व्रते उद्यापने उपवास कसे करावेत याची माहिती आहे. याशिवाय व्रतर्क, व्रतकौस्तुभ, जयसिंग कल्पद्रुम, मुक्तक संग्रह, यांसारख्या व्रतांवर अनेक लेख व निबंध लिहिले गेले आहेत.
शरीरस्वास्थासाठी ही उपवासाची गरज आहे. काया, वाचा, मनाचा निग्रह म्हणजे उपवास आहे. ही खुणगाठ आपण बांधली पाहिजे. शरीराच्या, मनाचा आरोग्यासाठी, शुध्दतेसाठी आपण शास्त्रशुध्द पध्दतीने उपवास केले पाहिजेत. उपवास करणे ही एक केवळ कृती म्हणुन करावयाची सहज क्रिया नसुन, स्वैर धावणाऱ्या मनाचा लगाम हा उपवास आहे. मनावर आणि शरीरावर ताबा मिळविण्यासाठीच शास्त्राने उपवास हे सोपे तंत्र आपणांस दिले आहे, याचा उपयोग सर्वांनी केला पाहिजे. व्रत, उद्यापने, उपवास हे हिंदू संस्कृती आणि धर्माचे प्राण आहेत. आपण त्यातील शास्त्र समजून घेवुन त्याचा अंगिकार करुयात.
– अजित दि. देशपांडे (लेखक भारतीय विद्या पारंगत असून संत विचार अध्यासनचे प्रमुख आहेत.)
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! पवन मावळात अतिमुसळधार पाऊस, पवना धरण 83 टक्के भरले, अकरा वाजता धरणाचे दरवाजे उघडणार
– वडगावात यंदा डीजे मुक्त गणेशोत्सव? नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे सामुहिक निर्णय, नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
– रोजगार हमी योजनेला नवे बळ ; आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली समितीची सक्रिय बैठक संपन्न । Maval News
– व्हिडिओ : मावळ तालुक्यातील गणपतीचे गाव असलेल्या शिळींब येथील गणेशमूर्ती कारखान्यांत कारागिरांची लगबग !