भद्रं कर्णेभिः क्षृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः*। हा शांतीमंत्र प्रत्येक धार्मिक कार्यात घोषासह म्हटला जातो. “भद्र” या शब्दाचा अर्थ ‘पवित्र’ असा आहे. जे जे काही जगात पवित्र आहे . शुध्द आहे ते मला प्राप्त होवो ही प्रार्थना यात आहे. ते ते प्राप्त करण्याचे पंचज्ञानेद्रियांपैकी एक ज्ञानेंद्रिय आहेत “कर्ण अर्थात कान”. भद्र आणि अभद्र हे दोन्ही एकाच माध्यमातुन स्वीकारता येते. आपल्या हातात आहे आपण दोघांमधुन काय निवडायचे ते. त्यासाठी संस्कारांचे महत्व आहे. संस्कारातुन पवित्र आणि अपवित्र यातील फरक लक्षात येतो. म्हणून हिंदू धर्मात 16 संस्कारांना विशेष महत्त्व आहे. ( karnvedh sanskar why are ears pierced why use bhikbali karnbhushana importance and tradition read )
संस्कार या प्रक्रियेचे महत्व प्राचीन ऋषींना माहिती असल्याने शुध्द बीज असल्या शिवाय वृक्ष ज्या पध्दतीने चांगली फळे देवु शकत नाही, त्याच पध्दतीने एक चांगली व्यक्ती होण्यासाठी जन्मापूर्वी पासूनच संस्कार होणे गरजेचे आहे हे त्यांनी जाणले. त्या मुळेच सोळा संस्काराची निर्मीती झाली. तीन संस्कार हे जन्मापूर्वीच केले जातात. भारतीय संस्कृतीत व्यक्तिमत्व विकासाला किती महत्त्व दिले आहे हे लक्षात येते. या पर्वातील नववा संस्कार म्हणजे कर्णवेद संस्कार.
या संस्काराची यादीत शास्त्रीय ग्रंथाप्रमाणे काही संस्कारातील नावात बदल दिसत असले तरी जवळपास सर्वच ग्रंथात हा संस्कार सांगितला आहे. काही शास्त्रकार याला दुसऱ्या संस्काराचा उपप्रकार मानुन त्यास तो संस्कार करण्यापूर्वी करुन घेतात. आश्वलायन, पारस्कर बौधयन गृहयसुत्रात या संस्काराची माहिती आहे. हिंदू धर्माची खुण ही कान टाचणे आहे. स्त्री पुरुष दोघांचे हि कर्णवेध करणे आवश्यक आहे. जगातील इतर कोणत्याच धर्मात हा संस्कार नसल्याने कान टाचलेली व्यक्ती ही हिंदू आहे हे सहज लक्षात येते. आता हि पध्दत फॅशनच्या नावाने इतरांनी स्वीकारलेली आहे ही बाब वेगळी .
कर्णवेध का महत्वाचा आहे याचा आधार काय ते पाहू –
मानवी कानाचा आकार कसा आहे?
जगात वेगवेगळया प्राणी मात्रांचे कान हे त्यांच्या जीवन जगण्याच्या पध्दतीस अनकुल असेच आहेत. मानव आणि माकड हे दोघाच्या कानाचे आकार साधारण पणे सारखे दिसतात. फक्त कानाचे चित्र समोर आणा व ते बारकाई पहा. मानवी कानाचा आकार हा गर्भाशयात असलेल्या शिशुच्या आकारा प्रमाणे असतो. म्हणजे गर्भाशयात 9 महिने शिशु ज्या (डोके खाली व पाय डुमडलेले) अवस्थेत असतो तसा असतो. कानाच्या आकारात सर्व मानवी अवयव समावलेले आहेत. कानाचा पाळीमध्ये मानवी डोके आहे, पाळीपासून बाहेरील पाळी हे पाठचा बाक आहे. Ear Acupuncture नावाने उपचार पध्दती नव्याने सुरु झाली आहे. परंतु भारतीय परंपरेत ती वैदिककाळापासूनच प्रचलित आहे.
कर्णछेद विधी हा साधारणपणे कानाच्या पाळीत लहान मुलाच्या वयाचे 1 महिन्या पासून ते 3 ते 4 वर्षापर्यत प्रथेप्रमाणे केले जातात. आभूषण जसे डुल, रिंगा घालण्यासाठी कर्ण छेद केला जातो असा एक समज आहे. परंतू आयुर्वेदिक ग्रंथात या विषयी काय लिहीले आहे ते पाहूयात. ‘सुश्रुत संहिता नावाचा प्रसिध्द ग्रंथ आहे त्यातील शारीरस्थान नावाचा आध्यायात रक्षाभूषण निमित्तं बालकस्य कर्णांविध्येत अर्थात रोगापासून रक्षणासाठी बालकाचे कार्णछेद करावा’ असे सांगितले आहे. तर, ‘शंखोपरि च कर्णान्ते त्यक्वार् यत्नेन सेवनीन व्यत्यासाध्दा शिरां विध्येदन्त्रवृध्दि निवृतये’ यामध्ये अंडकोशाचे रोग आतड्याचे रोग दूर करण्यासाठी कर्णछेद करावा असे सांगितले आहे. त्याच बरोबर आधुनिक शास्त्राने सुध्दा या बाबत छेदन विधीचे पाईट सांगितले आहेत.
सर्वसाधारण भारतीय ज्या ठिकाणी कर्णछेद करतात त्या ठिकाणी डोळे नाक कान मस्तिष्क्, दात जबडा आणि टाळू याचे रोगनिवारण केंद्र असते. कानात अनेक वर्षापर्यंत डुल घातले जातात, त्यामुळे ही केंद्रे आपोआप जागृत रहातात. मानवाला रोगांपासून दूर ठेवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय केले तर रोगच होणार नाहीत, ही जाणीव भारतीय समाजास पूर्वापार आहे. त्यामुळे फक्त धर्म या संकल्पने पलीकडे याचा शोध घेणे आज काळाची गरज आहे. कर्णछेद करुन त्यात आलंकार म्हणून अनेक दागिणे घालतात त्याच्या आकार त्या त्या छेदाचे महत्व विषद करतो. कर्णभूषणे ही फक्त दागिणे नसतात. त्याचे विविध आकार आणि त्याची वजने व त्यातील रत्ने याचा संबंधी शरिरशास्त्रा सोबत असतो. कुडी, झूमके, वेल, बुगडी, कुडकं यासोबत रिंगा, डुल आणि पुरुषासाठी भिकबाळी हा मोठा दागिणा असे.
भिकबाळी : पेशवाईत तर विद्वान व्यक्तींची खुण म्हणजे कानातील भिगबाळी असे. त्याचे खरे नाव माहित नसल्याने हा दागिणा वेगवेगळ्या नावे संबोधला जातो. यास फक्त बाळी म्हणावे. या दागिण्याचे खरे नाव फक्त बाळी असेच आहे. भिक हे त्या पुढे लावलेले उपनाव आहे. परंपरेनुसार त्या विषयी कथा सांगितली जाते की मुलाना दृष्ट लागू नये यासाठी लोकांकडून पैसे म्हणजे भिक मागून हा दागिणा तयार केला, म्हणून यास भिकबाळी म्हणतात. पण ते खरं नाही हा शब्द भेद आहे. ज्या ठिकाणी बाळी घातले जाते ते ठिकाण आहे. कर्णातील मानवी आकारातील “मुलाधार स्थानांचे” आहे. मुलाधारस्थान हे गणपतीचे स्थान मानले जाते. जेथे कुंडलनी शक्ती स्थित असते.
त्वं मूलाधार स्थितोऽसि नित्यं। असे वर्णन गणपती अथर्वशीर्ष मध्ये आहे. गणपती म्हणजे बुध्दीची देवता. या स्थानाला चिनी शास्रा्मतही महत्व सांगितले आहे Erjian म्हणजेच Ear Apex । एर्जियान स्थान: ऑरिकलच्या वरच्या भागावर, ऑरिकल पुढे दुमडवा, बिंदू ऑरिकलच्या शिखरावर आहे. डोळ्यांचा लालसरपणा, सूज आणि वेदना, दृष्टी धूसर होणे ,सतत घाम येणे, छातीत धडधडणे या रोगावर या ठिकाणी छेद करुन उपचार केला जातो. मेंदू तल्लक होतो. स्मरणशक्ती वाढते. या मुळे झोप शांत लागते. उष्णता कमी होवुन पोट साफ करते, डोळ्यांना फायदा होतो, सूज कमी करते, उच्च रक्तदाबावर उपचार करते. असे अनेक फायदे बाळी घालण्याचे आहेत.
प्राचीन काळी ज्या हिंदूंनी कर्णवेध विधी केले नाहीत, त्यांना श्राद्ध करण्याचा अधिकार मिळाला नाही, असे म्हटले जाते. हा संस्कार कोणत्याही पवित्र ठिकाणी केला जाऊ शकतो. यामध्ये प्रथम देवतांची पूजा केली जाते. त्यानंतर ते सूर्याकडे तोंड करून बसतात. या दरम्यान हातात चांदीची, सोन्याची किंवा लोखंडाची सुई असते. यानंतर मुलाच्या कानात पुढील मंत्र उच्चारला जातो. भद्रम् कर्णेभिः क्षर्णुयम देवा भद्रम् पश्यमेक्षभिर्यजत्रा । आज आपण जे ऐकतो ते साधन शुध्द आणि आरोग्याचे व्दार आहे. त्यातून कायम चांगले ते श्रवण केले पाहिजे. शेवटी कान म्हणजे संपूर्ण शरीर आहे हे लक्षात घेवुन आपण कोणाकडून कान टोचून घेतो. कानगोष्टी करतो या वर आपले संपूर्ण भवितव्य अवलंबून आहे ( karnvedh sanskar why are ears pierced why use bhikbali karnbhushana importance and tradition read )
लेखक – अजित देशपांडे (भारतीय विद्यापारंगत – भारतीय संस्कृती आणि परंपरा लेखमाला)
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष । नारळी पौर्णिमा – “सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा…..”
– वडगावमध्ये ‘राखी विथ खाकी’ : मोरया प्रतिष्ठानच्या महिला सहकाऱ्यांनी पोलिस बांधवांना बांधली राखी
– आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत कृषि पायाभूत सुविधा निधी योजना (AIF) कार्यशाळेचे वडगाव इथे आयोजन