पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली व मुळशी तालुक्यातील काही गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्यादृष्टीने संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी संपूर्ण पुणे जिल्हा लम्पी चर्म रोगासाठी ‘नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित केल्याचे आदेश जारी केले आहेत. काही जनावरांचे लम्पी रोग नमुने सहआयुक्त पशुसंवर्धन विभाग व रोग अन्वेषण विभाग, औंध यांच्या अहवालानुसार सकारात्मक आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी हे आदेश जारी करत उपाययोजना नमूद केल्या आहेत. ( Entire Pune District Declared Controlled Zone To Prevent Outbreak Of Lumpy Skin Disease Read What Are Restrictions )
गुरे आणि म्हैस वर्गीय वगळून गोजातीय प्रजातीमधील इतर सर्व प्राणी यांना ज्या ठिकाणी ते पाळले जातात त्या ठिकाणापासून नियंत्रण क्षेत्रातील किंवा क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण व वाहतूक करताना किमान 28 दिवसांपूर्वी लम्पी चर्मरोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील. बाधीत गोजातीय प्रजातीचे जीवंत अथवा मृत प्राणी, बाधीत झालेल्या गोजातीय प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी गवत किंवा अन्य साहित्य आणि अशा प्राण्याचे कातडी किंवा कोणताही भाग किंवा अशा प्राण्यांपासूनचे अन्य कोणतेही उत्पादन नियंत्रित क्षेत्रामधून बाहेर नेण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोणत्याही गोजातीय प्रजातीच्या प्राण्याचे बाजार भरवणे व बाजारातील खरेदी विक्री करताना किमान 28 दिवसापूर्वी लम्पी चर्मरोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा आरोग्य दाखला बाजार समितीस सादर करणे बंधनकारक राहील. गोवर्गीय प्राण्यांच्या शर्यती, जत्रा भरवणे, प्रदर्शन याठिकाणी सहभागी होणारी सर्व गोवर्गीय प्रजातीच्या जनावरांचे किमान 28 दिवसांपूर्वी लम्पी चर्म रोगासाठी प्रतिबंधात्मक गोट पॉक्स लसीकरण केल्याचे लसीकरण प्रमाणपत्र व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा आरोग्य दाखला आयोजकास सादर करणे बंधनकारक राहील.
प्रयोगशाळा निदानामध्ये ज्या भागातील पशुपालकाचे गोजातीय प्रर्वगातील जनावरांना लम्पी चर्म रोग झाल्याचे निष्कर्ष सकारात्मक येतील अशा ठिकाणापासून 5 कि.मी. त्रिजेच्या परिघामधील सर्व संक्रमित न झालेल्या जनावरांचे लसीकरण (रिंग व्हॅक्सीनेशन) त्वरीत करुन रोगाचा फैलाव इतरत्र होणार नाही यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. लम्पी रोगाचा फैलाव इतरत्र होऊ नये यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाह्य किटक नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात यावा.
लम्पी चर्म रोगाविषयी पशुपालकामध्ये जनजागृती होण्याच्यादृष्टीने ग्रामपंचायतीमार्फत व्यापक प्रसिद्धी करण्यात येवून रोगाचे नियंत्रण व निर्मुलन पशुसंर्वधन विभागाच्या समन्वयाने कामकाज करावे. हे आदेश पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहतील व लम्पी चर्म रोग परिस्थितीचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आलेले आहे. ( Entire Pune District Declared Controlled Zone To Prevent Outbreak Of Lumpy Skin Disease Read What Are Restrictions )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष – कर्णवेध संस्कार । कान का टोचले जातात? भिकबाळी का वापरावी? कर्णभुषणे महत्व व परंपरा, वाचा…
– जुना मुंबई पुणे हायवेवर अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल
– दैनिक मावळ विशेष । नारळी पौर्णिमा – “सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा…..”