‘तत्कालीन आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवर लादलेला झिजिया शास्तीकराचे भूत हटविले. शास्तीकराचे ओझे कमी करत सर्वसामान्य नागरिकांचे 650 कोटी रुपये आम्ही माफ केले. आता शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला जाईल. कोणालाही बेघर करणार नाही,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसंकल्प अभियान सभा किवळे येथील मुकाई चौकात शनिवारी (6 जानेवारी) पार पडली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विजय शिवतारे, इरफान सय्यद, शीतल म्हात्रे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहरप्रमुख निलेश तरस यावेळी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत शिवसंकल्प अभियानाची सुरुवात केली. आपले सरकार आल्याने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येतो, लोक उत्स्फूर्तपणे स्वागत करतात. दीड वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही. राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेल्याचे काही लोक म्हणतात. पण, आपले राज्य उद्योगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. गतिमान पद्धतीने हे सरकार चालले आहे. लोक, जनहिताचे निर्णय घेतले. हे निर्णय सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविले पाहिजेत. महायुतीच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. ( Regularize unauthorized constructions in Pimpri Chinchwad Testimony of CM Eknath Shinde )
धाडस केले नसते तर शिवसेना दिसली नसती – युती म्हणून आम्ही मते मागितली, सर्वसामान्य लोकांनी युती म्हणून मतदान केले होते. पण, निकाल आल्यानंतर काही लोकांनी सर्व दरवाजे उघडे आहेत म्हणत काँग्रेसला डोक्यावर घेतले. सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपला विश्वास फोल ठरला. शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले, अन्याय होऊ लागला. संघटना कमकुवत होत होती. आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हतो. मला कोणताही स्वार्थ नाही. शिवसेना, धनुष्यबाण, शिवसैनिकांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी निर्णय घेतला. गहाण ठेवलेला धनुष्यबाण वाचविला. आम्ही धाडस केले नसते तर शिवसेना दिसली नसती.
उंटावरून शेळ्या हाकत नाही – शिवसैनिकांला मुख्यमंत्री बनवतो म्हणून स्वतःच मुख्यमंत्री झाले. खुर्चीवर बसले. मला मुख्यमंत्री केले नाही, याचे दुःख नाही. परंतु, मुख्यमंत्री बनून काय कमविले याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे. आरोप करून भागणार आहे का याचा विचार करावा. मी बाळासाहेब, शिवसेनेच्या भूमिकेबाबत तडजोड करणार नाही. त्यामुळे लोक माझ्यासोबत येत आहेत. खरी शिवसेना आपली आहे कारण धनुष्यबाण आपल्याकडे आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरते माझे काम नाही. संपूर्ण महाराष्ट्र माझा परिवार आहे. घरात बसून उंटावरून शेळ्या हाकत नाही, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगविला.
गहाण ठेवलेला धनुष्यबाण वाचविला – बाळासाहेबांचे विचार आमच्यासोबत असल्याने लोक आमच्याकडे येत आहेत. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विनाकारण आरोप करत असतात. त्यांना कामामधून उत्तर देतो. अनेक लोकांची साफसफाई केली जाईल. मला कोणताही स्वार्थ नाही. गहाण ठेवलेला धनुष्यबाण वाचविला. राज्य सरकारला केंद्राचे पाठबळ मिळते. पाठविलेले प्रस्ताव तत्काळ मान्य होतात, एक रुपयाही कट होत नाही.
दहा जनपथला मुजरा करण्यासाठी दिल्लीला जात नाही – अडीच वर्षे अहंकारापोटी राज्याला मागे नेले होते. डबल इंजिन सरकार गतिमान पद्धतीने काम करते. आम्ही राज्यात निधी, प्रकल्प आणण्यासाठी दिल्लीला जातो. दिल्लीला दहा जनपथला मुजरा करण्यासाठी जात नाही, असे उत्तर विरोधकांच्या दिल्लीला जाण्याचा आरोपांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चोवीस तास काम करतात. जागेवर निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची त्यांची ख्याती आहे. तत्कालीन आघाडी सरकारने लादलेले शास्तीकराचे भूत मुख्यमंत्र्यांनी उतरविले. शहरातील शास्ती कराचा प्रश्न सोडवून सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा दिला. शहरातील विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न प्रलंबित असून तो सोडवावा. उगमापासून इंद्रायणी, पवना नदी स्वच्छ करण्याचा संकल्प केला. या कामाला मुख्यमंत्री शिंदे यांनी गती दिली आहे. पुणे ते लोणावळा रेल्वेचा तिसरा आणि चौथा मार्ग पूर्ण करण्यासाठी शासनाने सहकार्य करावे.
अधिक वाचा –
– महाराष्ट्र राज्य क्रिकेट संंघात निवड झाल्याबद्दल चैतन्य कोंडभर याचा बाळा भेगडे यांच्या हस्ते सन्मान । Chaitanya Kondbhar
– मोठी बातमी! 1256 वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा, पेसा क्षेत्रातील पदे वगळून होणार वनरक्षकांची भरती
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पाहा कोणकोणत्या केल्यात गाड्या रद्द, वाचा संपूर्ण यादी । Pune Lonavala Local