“मावळातील रखडलेला विकास करण्यासाठी यावेळी कोणाच्या हवेवर निवडून येणारा नव्हे तर सुस्वभावी आणि सुसंस्कृत सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिवसरात्र काम करणारा उमेदवार संजोग वाघेरे यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला आहे. अशा तरूण उमेदवाराला निवडून आणण्याचा निर्धार करत सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला व आपल्या नात्या गोत्यातील असलेला उमेदवार म्हणजेच संजोग वाघेरे असून त्यांना निवडून दिल्लीला पाठवायचे आहे”, असे वक्तव्य मावळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाविकास आघाडी (इंडिया) चे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ आंबी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मावळ तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहकार महर्षी माऊली दाभाडे यांसह पुणे जिल्हा शिवसेनेचे संघटक माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस निखिल कवीश्वर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ, प्रचार प्रमुख व उपजिल्हा प्रमुख भारत ठाकूर, तळेगावचे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, संभाजी राक्षे, माजी सरपंच संदीप काशिद, शैलेश मुऱ्हे, गोविंद अंभोरे, मोहन घोलप व पदाधिकारी तसेच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच आंबी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते. ( maval ncp leader mauli dabhade on sanjog waghere candidacy )
माऊली दाभाडे यांनी मावळ विधानसभा क्षेत्रात मागील काही दिवसांपासून मेळावे आयोजित केले आहेत. जिल्हा परिषद गटनिहाय मतदारांच्या भेटी घेत त्यांनी इंडिया आघाडीला निवडून देणे का गरजेचे आहे हे सांगत आहे. मावळ तालुक्याचा विकास साधायचा असेल तर यावेळी संजोग वाघेरे यांच्याशिवाय पर्याय नाही असे दाभाडे यांनी सांगितले. मागील दोन निवडणुकीत मावळ तालुक्याने ज्यांना निवडून दिले त्यांनी काय विकास केला हे सर्वांना माहीत आहे. दहा वर्षात एक सांगता येईल असे काम केले नाही. युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविला नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता आले नाही, महिलांसाठी काही ठोस करता आले नाही. निसर्ग संपन्न मावळ तालुका असताना येथील पर्यटन विकासासाठी काय केले? असा सवाल दाभाडे यांनी उपस्थित केला.
मावळात अनेक ठिकाणी वनविभागाच्या अडथळ्यामुळे कामे थांबली आहेत, हा केंद्राशी निगडित विषय असताना तो प्रश्न कधी मांडला नाही. कोणताच प्रश्न सुटलेला नाही, मतदार संघात कधी फिरायचे नाही, मतदारांचे प्रश्न समजून घ्यायचे नाही ते सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत, अशा व्यक्तीला पुन्हा का? व कशासाठी निवडून द्यायचे, असा प्रश्न मेळाव्यात अनेकांनी उपस्थित केला. ‘मावळातील रखडलेला हा विकास करण्यासाठी यावेळी कोणाच्या हवेवर निवडून येणार नाही तर सुस्वभावी आणि सुसंस्कृत अशा तरूण उमेदवाराला निवडून आणायचेच, सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला, सर्वसामान्य मतदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिवसरात्र काम करणारा व आपल्या नात्यागोत्यातील असलेला उमेदवार म्हणजेच संजोग वाघेरे यांना निवडून दिल्लीला पाठवायचे आहे. त्यांच्याकडून मावळातील पर्यटनाचे, युवकांचे, शेतकरी व महिलांचे प्रश्न सोडवून घेण्याची जबाबदारी आम्ही व्यासपीठावर बसलेले सर्वजण घेतो,’ असे यावेळी सांगण्यात आले.
अधिक वाचा –
– “ना मावळातून ना चिंचवडमधून, श्रीरंग बारणेंना लीड मिळणार ‘या’ विधानसभा मतदारसंघातून”, देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी, वाचा सविस्तर
– ‘पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना निवडणूकीतून धडा शिकवा’, संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी वरुण सरदेसाई यांची मशाल यात्रा
– ‘काँग्रेसच्या राजवटीत 100 पाठवले की 15 मिळायचे आता थेट पैसे खात्यात येतात’, लोणावळ्यात चित्रा वाघ यांच्याकडून बारणेंचा प्रचार