हल्लीच्या काळात माणूसकी हरवत चालली आहे, असे नेहमीच म्हटले जाते. याला कारणीभूत म्हणजे प्रत्येकाला आलेले काही अनुभव असतात किंवा डोळ्यांनी पाहिलेले काही प्रसंग असतात. परंतू ही झाली फक्त नाण्याची एक बाजू. आपल्या आजूबाजूला नकळत अशाही काही गोष्टी घडत असतात, ज्यातून समाजातील माणूसपण टिकवून ठेवले जाते. मावळ तालुक्यात देखील माणूसपण जिवंत ठेवणारी आणि सामाजातील एकोपा वाढवणारी एक घटना घडली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील सावंतवाडी या गावाने माणूसकीचा नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सावंतवाडी गावातील सामान्य कुटुंबातील शेतकरी मुकुंद नथू घायाळ यांचे काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले. गावातील एखादा व्यक्ती जेव्हा जातो, तेव्हा ते दुःख कुणा एकाच्या घरातील नसते, तर संपूर्ण गावाचे असते, ही गोष्ट गावात राहिलेला व्यक्ती लवकर समजू शकतो. कै. मुकुंद घायाळ यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आणि चार मुली यांच्या पाठीवरचा आधाराचा हात कायमचा पारखा झाला. ( Financial assistance for education of children who lost their father from Sawantwadi villagers Maval )
- दिनांक 15 जून रोजी राज्यासह मावळ तालुक्यातील शाळाही सुरू झाला. शाळा सुरू म्हटल्यावर शाळेची फी, दप्तर, वह्या, गणवेश आदी गोष्टी आल्या. परंतू घरातील कर्ता गेल्याने चार लेकींच्या शिक्षणाची काळजी कै. मुकुंद यांच्या पत्नीला लागून राहिली होती. पतीच्या पश्चात खडतर आर्थिक परिस्थितीत मुलींचा सांभाळ करण्याचे दिव्य त्यांना करावे लागणार आहे. परंतू कै. मुकुंद यांच्या घराची आर्थिक परिस्थिती आणि घरावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराची कल्पना गावकऱ्यांना नक्कीच होती. त्यामुळे गावकऱ्यांनी या गोष्टीचा योग्यरित्या विचार करत चांगल्या कृतीसाठी एकी केली.
‘आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो’, या उक्तीप्रमाणे सावंतवाडी गावातील आजी-माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, गावातील युवा कार्यकर्ते यांच्यासोबतच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि सावंतवाडीतील ग्रामस्थ मंडळी यांनी प्रत्येकाला जमेल तशी आर्थिक राशी एकत्र केली. ही राशी रोख स्वरूपात मुलींच्या पुढील शिक्षणासाठी ‘एक हात मदतीचा’ स्वरूपात श्रीमती घायाळा यांच्याकडे सुपूर्द केली. ग्रामस्थांच्या या आधाराने आणि मदतीने भारवलेल्या श्रीमती घायाळ यांनी गावकऱ्यांचे आभार मानले. सावंतवाडी ग्रामस्थांच्या या कृतीचे आता सर्व पंचक्रोशीत कौतूक होत आहे.
‘आमच्या गावातील कै. मुकुंद घायाळ यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही ग्रामस्थांनी आपापल्या परीने होईल तशी शक्य ती मदत केली. परंतू अशी परिस्थिती तालुक्यातील अन्य गावातही आहे. त्यामुळे त्या गावातील ग्रामस्थांना आमची विनंती आहे की, तुमच्या गावात असे कोणी कुटुंब असेल तर त्यांना तुम्ही शक्य होईल तितकी आर्थिक मदत करण्याचा नक्की प्रयत्न करा,’ असे आवाहन सावंतवाडी ग्रामस्थांनी केले आहे.
अधिक वाचा –
– ‘लोकसभेतील पराभवाने खचून न जाता पुन्हा ताकदीने मैदानात उतरू’, लोणावळा येथील बैठकीत ‘वंचित’चा निर्धार । Lonavala News
– शिवसेना पक्षाच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त लोणावळ्यात वृक्ष लागवडीसह स्वच्छता मोहिम । Lonavala News
– इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान तातडीने हाती घ्यावे; रविंद्र भेगडे यांचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन । Maval News