तळेगाव दाभाडे परिसरात अंधाधुंद गोळीबार करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच त्यांच्याकडून एकुण 7 गावठी पिस्तुले व 14 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. गुरूवारी (दि. 20 जून) रात्री 8 च्या सुमारास अज्ञात टोळक्यांनी तळेगाव शहरातील चार ठिकाणी ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागायचं नाही’ असं म्हणत हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी तातडीने याप्रकरणी पथके तयार करून संशयित आरोपींचा शोध घ्यायला सुरूवात केली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पहिली कारवाई – तळेगाव दाभाडे येथे गुरुवारी, दि. 20 जून रोजी रात्री 8.010 ते 8.30 च्या दरम्यान गजानन महाराज चौक ते राजेंद्र चौक दरम्यान पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी रोहन ऊर्फ चिक्या उत्तम शिंदे, विकी खराडे आणि त्यांचे अनोळखी 4 साथीदारांनी मोटार सायकलींवर येवून “आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागायच नाही” असे मोठमोठ्याने बोलून शिवीगाळ करत त्यांच्या हातातील पिस्तुलाने गोळीबार करत लिंबफाट्याचे दिशने निघून गेले होते. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे पोलीस आनंद तुकाराम मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींविरोघात भारतीय दंड विधान कलम 308, 143, 144, 147, 148, 149 भारतीय हत्यार कायदा क. 3 (25) (27) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अक्ट कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्यानंतर गुन्हे शाखेचे युनिट व ब्रॅन्च तसेच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत होते. आरोपींचा शोध घेत असताना गुंडा विरोधी पथकातील सहा.फौज. प्रविण तापकिर व पोलिस हवालदार चौधरी यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे गुंडा विरोधी पथकातील अधिकारी पोउपनि जगताप व अंमलदार यांनी नाशिक येथे जाऊन आरोपी 1) रोहन ऊर्फ चिक्या उत्तम शिंदे (वय 18 वर्षे, रा. कातवी रोड, तळेगाव दाभाडे) 2) निरज ऊर्फ दाद्या बाबू पवार (वय 19 वर्षे, रा. नेहरुनगर, पिंपरी) 3) आदित्य नितीन भोईनल्लू (वय 21 वर्षे, ता. शिरुर जि. पुणे) यांना ताब्यात घेतले आणि पुढील तपासासाठी तळेगाव दाभाडे पोलीसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरोपींना वडगाव न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कस्टडीची रिमांड सुनावली आहे. अटक आरोपींकडुन तपासामध्ये एकुण 3 गावठी पिस्तुले आणि 8 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
हे आरोपी गुंडा विरोधी पथकाच्या ताब्यात असताना त्यांच्याकडे तपास केला असता मिळालेल्या माहितीनुसार आणखी काही अवैध शस्त्रे परिसरात असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पो.उ.नि. अशोक जगताप व पो.उ.नि. हजरत पठाण यांची दोन पथके तयार करुन तळेगाव दाभाडे परिसरात रवाना करण्यात आली होती.
दुसरी कारवाई – पो.उ.नि. अशोक जगताप यांच्या पथकाने निलया नाईकनवरे सोसायटी (तळेगाव दाभाडे) येथून ओमकार ऊर्फ बंटी दत्ता आसवले (वय 20 वर्षे, रा. मु.पो. टाकवे बु, ता. मावळ) याला ताब्यात घेवून त्याच्याकडून 51 हजार रुपये किमतीचे 1 गावठी पिस्तुल आणि 2 जिवंत काडतुसे हस्तगत करुन त्याच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातगुन्हा नोंद करून भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपीला प्रथमवर्ग न्यास दंडाधिकारी वडगाव न्यायालयालयात हजर केले असता कोर्टाने 4 दिवसांची पोलीस कस्टडीची रिमांड दिली आहे.
तिसरी कारवाई : पो.उप.निरी. हजरत पठाण यांच्या पथकाने तपोधान कॉलनी गार्डन वराळे रोड तळेगाव येथून संशयितरित्या थांबलेल्या 1) समर्थ संभाजी तोरणे (वय 19 वर्षे, रा. कात्रज, पुणे) 2) अमन मेहबुब शेख (वय 19 वर्षे, रा. कोंढवा, पुणे) याना ताब्यात घेवून त्यांच्या कब्जातून 1 लाख 52 हजार रुपये किमतीची 3 देशी बनावटीचे पिस्तुले आणि 4 जिवंत काडतुसे हस्तगत केली. त्यांच्यावर तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींला वडगाव न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कस्टडीची रिमांड सुनावली आहे. सदर कारवाईत पोहवा मेदगे, पोना शामबाबा यांनी तांत्रिक विश्लेषणाची विशेष कामगिरी केली.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त सुनिल रामानंद, अपर पोलीस आयुक्त डॉ. श्री. वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस उप निरीक्षक अशोक जगताप, हजरत पठाण, पोलीस अंमलदार प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मेदगे, विजय गंभिरे, सुनिल चौधरी, मयुर दळवी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, शुभम कदम, रामदास मोहीते, ज्ञानेश्वर गिरी, तौसिफ शेख आणि नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– पुणे रिंगरोड बाबत महत्वाची बातमी ! ‘एमएसआरडीसी’कडून प्रकल्पाबाबत महत्वाची अपडेट समोर । Pune Ring Road
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत 161 इमारती धोकादायक । Talegaon Dabhade
– वडगावमध्ये पंढरपूरला पायी जाणाऱ्या दिंडीचा सन्मान ; पोटोबा महाराज देवस्थानचा वार्षिक अहवालही प्रकाशित । Vadgaon Maval