पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, आंबेगाव या पश्चिम घाटामध्ये वर्षा विहारासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने कंत्राटदारांनी जलाशयात नौकाविहार करताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी केले आहे. नौकाविहार करण्यासाठी संबंधित पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांचे ना हरकत प्रमाणपत्र कंत्राटदाराने घ्यावे. नौकाविहाराच्या दरम्यान धरणाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पर्यटकांची तपासणी व्यवस्था कंत्राटदाराकडून उभारण्यात यावी. कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्यासी संपूर्ण जबाबदारी ठेका घेणारी संस्था किंवा व्यक्ती यांची असेल. नौकेच्या प्रवासी क्षमतेनुसार विमा उतरवणे संस्थेवर बंधनकारक राहील.
पुणे जिल्ह्यात प्रकल्पांवर निषिद्ध क्षेत्र म्हणून विहित करण्यात आलेले ठिकाण पर्यटकांसाठी वर्ज्य राहतील व अशा ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत, याचे सनियंत्रण करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहील. तलावात तसेच धरणाच्याखालील बाजूने काही अंतरापर्यंत व सभोवतालची व आवश्यक त्या इतर ठिकाणाचे काही क्षेत्र वरील प्रमाणे पर्यटक निषिद्ध म्हणून ठरविण्यात येईल. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पर्यटकांच्या सुरक्षिततेबद्दल कंत्राटदार आवश्यक ती व्यवस्था करील व त्यासंबंधात ते पूर्णतः जबाबदार राहतील. जलाशयातून कालव्यात सोडल्या जाणाऱ्या प्रवाहात किंवा सांडव्यावरुन जाणाऱ्या जलाशयातील पाण्याच्या प्रवाहात पर्यटक येणार नाहीत याकरीता त्यांना योग्य त्या पूर्व सूचना देण्यात याव्यात. जलाशयातील पाणी पातळी पूर्ण जलाशय पातळीच्यावर गेल्यास जलाशयात जलक्रीडा करण्यास मज्जाव करण्यात यावा. पर्यटक त्यात सापडल्यामुळे त्यांना इजा झाल्यास त्याची सर्व जबाबदारी कंत्राटदाराची राहील. पर्यटकांच्या सुरक्षिततेसंबंधी कायदेशीर प्रश्न व इतर बाधा निर्माण झाली व त्यांना काही भरपाई दाखल रक्कम देणे आवश्यक झाल्यास त्याबाबतीत सर्व जबाबदारी कंत्राटदाराची राहील व त्या संबंधातील सर्व खर्च कंत्राटदार देईल.
धरणातील पाणी पातळीचा विचार करता जलक्रीडा क्लब (बोट क्लब) हा धरणापासून सुमारे दोन कि. मी. अंतरावर असावा. एका बोटीमागे जास्तीत जास्त दोन चालकांची नेमणूक करावी. दोन्ही चालकांचे ओळखपत्र घेणे बंधनकारक राहील. कामावर असताना चालकांनी त्यांचे ओळखपत्र सदैव जवळ बाळगणे आवश्यक राहील. जलाशयात बोट चालविण्यास मंजुरी दिल्यानंतर परवानगी दिलेल्या क्षेत्रात सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वा. या कालावधीत बोट चालविता येईल, रात्री बोट चालवू नये. बोटीचा वेग ताशी ५ ते २० कि.मी. दरम्यान ठेवावा. बोटीला पांढऱ्या व लाल रंगाचे तीन आडवे पट्टे ऑईल पेंटने रंगविणे आवश्यक आहे.
बोटीच्या दोन्ही बाजूस पुरेसे परार्वतक लावावे. बोटी या जलक्रीडेसाठी असल्यामुळे यामधून सामानाची ने-आण, स्फोटके, शस्त्रे याची वाहतूक करणे हा गंभीर गुन्हा आहे. बोटीवर अनधिकृत दूरसंचार यंत्रणा बसविणे अथवा यंत्रणेचा वापर करण्यास पूर्णतः प्रतिबंध राहील. प्रकल्पाच्या सुरक्षिततेचे काम पाहणाऱ्या पोलीसांनी किंवा प्रकल्प अधिकाऱ्यांनी भोंग्याचा अथवा अन्य प्रकारे इशारा करताच चालकाने जलक्रीडा थांबवून बोट बाहेर काढावे.
धरणापासून ठरवून दिलेल्या जलाशयातील अंतराच्या आत बोट आणता येणार नाही. अशाप्रकारे धरणाच्या जवळ बोट आणल्यास परवाना रद्द करण्यात येईल, यासाठी धरणापासूनच्या ठराविक अंतरावर कंत्राटदारास स्वखर्चाने पाण्यामध्ये तरंगते ठोकळे (परावर्तीत होणारा रंग देऊन) टाकून त्यास साखळी लावून सुरक्षित भाग दर्शवावा लागेल. बोटीवर प्रस्तावित केल्याइतकेच प्रवासी घेता येतील. तसेच तेव्हढी सुरक्षा कवचे (लाईफ जॅकेट्स) बोटीवर ठेवणे बंधनकारक राहील. बोट चालविण्याचा परवाना हा करारनामा केल्यापासून ५ वर्षांसाठी राहील, दर ५ वर्षानी सदर परवान्यांचे नूतनीकरण करणे बंधनकारक राहील.
जलाशयांचा वापर पिण्याच्या पाण्याकरीताही केला जात असल्याने त्या ठिकाणी विशेष स्वच्छता राखली जाईल. परवानाधारकाकडून जलाशयात कोणत्याही प्रकारचे प्रदुषण झाल्यास व त्यामुळे जीवित वा वित्त हानी झाल्यास तसेच पर्यावरणास नुकसान पोहचल्यास त्याच्याविरुद्ध दंडनीय कार्यवाही करण्यात येऊन परवाना रद्द करण्यात येईल. ( Boating regulations for safety of tourists Many terms and conditions for boat club owners read in detail )
पर्यटकाकडून धरणाच्या सुरक्षिततेला बाधा पोहचणार नाही याची विशेष काळजी घ्यावी व याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबधित कंत्राटदाराची राहील. शासनाकडून वेळोवेळी जलाशयात बोट चालविण्याचे अथवा धरण सुरक्षिततेच्या संदर्भात करण्यात येणाऱ्या कोणत्याही नियमांचे पालन करणे कंत्राटदार व परवाना धारकांस बंधनकारक राहील, असे निर्देश डॉ. दिवसे यांनी दिले आहे.
अधिक वाचा –
– बापरे बाप ! कार्ला फाटा येथे तब्बल 48 किलो गांजा जप्त, तिघांना अटक, 15 लाखांचा मुद्देमाल जप्त । Lonavala Crime News
– तळेगावात अपघात ! भरधाव कारने 7 वर्षीय चिमुकल्याला उडवले । Talegaon Dabhade
– मावळात यांत्रिक पद्धतीने भात लागवड ; शेतकऱ्यांनी भात शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर करण्याचे कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन