Dainik Maval News : मावळ तालुक्यात सध्या निसर्ग पर्यटनास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे धरतीने हिरवा शालू नेसला असून डोंगळांवरून कोसळणाऱ्या जलधारांमुळे अलौकिक निसर्ग सौंदर्य बहरले आहे. हे निसर्ग सौंदर्य पाहायला राज्यभरातून पर्यटक मावळ तालुक्यात येत आहेत. त्यामुळे मावळातील किल्ले, लेण्या, धरणे आदी ठिकाणी गर्दी होत आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगून पर्यटन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु, अनेकदा पर्यटकांनी परिसराची माहिती नसल्याने छोटेमोठे अपघात घडत असतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रविवारी (दि. 21 जुलै) किल्ले तुंग येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या एका महिलेचा घसरून पडल्याने अपघात झाला. त्या महिलेला सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी तत्काळ मदत केली. तुंग किल्यावर मुंबईमधून काही पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले होते. त्यातील एक मुलगी बालेकिल्यावरून उतरताना पाय सरकून जोरदार पडली आणि तिचा पाय घोट्याजवळ संपूर्णपणे वाकडा झाला. किल्याच्या पायथ्याजवळ सह्याद्री प्रतिष्ठान मावळ तालुका यांच्या वतीने आपत्कालीन बोर्ड लावण्यात आला आहे. तसेच अनेक ठिकाणी आपत्कालीन नंबर तुंग किल्याबाबत देण्यात आले होते. त्याचा उपयोग या पर्यटकांनी केला. ( Accident of woman due to slip on Tung fort Maval Taluka )
त्यांनी सचिन शेडगे याना फोन केला. झालेल्या प्रसंगाबद्दल माहिती दिली आणि मदतीचे आवाहन केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पायथ्या जवळ राहणारे सह्याद्रीचे दुर्गसेवक गुरु शेडगे, साईनाथ शेडगे, विलास शिंदे,अतुल पाठारे, शुभम हनमघर याना किल्यावर स्ट्रेचर घेऊन पाठवले आणि जखमी मुलीस सुखरूप प्राथमिक उपचार करून स्ट्रेचरवरून पायथ्याशी आणले. पुढील उपचारासाठी तिला दवाखान्यात पाठवून दिले.
काही महिन्यांपूर्वी घोरपडे प्रतिष्ठान मार्फत अशा स्ट्रेचर मावळ तालुक्यातील प्रत्येक किल्याला भेट म्हणून दिल्या होत्या. त्याचा फायदा आज प्रत्यक्षात झाला त्या मुळे अश्या प्रकारच्या स्ट्रेचर, व फर्स्ट ऍड किट च्या सोयी प्रत्येक किल्याच्या पायथ्याशी व्हाव्यात ही अपेक्षा व्यक्त केली आहे.
अधिक वाचा –
– पवना धरणात बुडून 28 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू
– मावळ तालुक्यात ७० टक्के भात लागवडी पूर्ण, पवन मावळ विभागात सर्वाधिक लावणी
– येळसे गावात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ‘पीक विमा पाठशाळा’ संपन्न, विमा कंपनी आणि कृषी विभागाकडून मार्गदर्शन