Dainik Maval News : राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असलेले शहर म्हणजे मुंबई. तर, राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेले शहर म्हणजे पुणे. ही दोन्ही शहरे राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहेत, त्यामुळे या दोन शहरांतील दळणवळण जलद, सोपे आणि सुरक्षित असेल यासाठी शासन सदैव प्रयत्नशील असते. पुणे – मुंबई असा दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे हे अंतर कमी कसे होईल? यासाठी शासनाकडून नवनवीन प्रकल्प हाती घेतले जातात. अशात आता नजीकच्या काळात मुंबई ते पुणे रेल्वे प्रवास सुपरफास्ट व्हावा, यासाठी नवीन रेल्वे मार्ग तयार केले जाणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. यामुळे मुंबई – पुणे या दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास अधिक जलद होणार आहे.
मुंबई आणि पुण्याला जोडण्यासाठी कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत असे दोन नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. सध्या मुंबईहून पुण्याला रेल्वेने जायचे असेल तर लोणावळा घाटातून जावे लागते. यात पर्वतरांगांना वळसा घालून प्रवास करावा लागतो. यामुळे सध्याच्या रेल्वे मार्गाची लांबी ही अधिक आहे. तसेच सध्याच्या मार्गाने लोणावळा घाटात रेल्वेचा वेग देखील कमी होतो. परंतु प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे लोणावळा घाट बायपास होणार आहे. याचाच अर्थ लोणावळा घाटातून न जाता प्रवाशांना रेल्वेद्वारे मुंबईहून थेट पुणे गाठता येणार आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे दोन नवीन रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामुळे लोणावळा शिवाय रेल्वे प्रवाशांना पुणे गाठता येणार आहे. नव्या मार्गावर एक्सप्रेसचा वेग दुप्पट होणार आहे. त्यामुळे वेगाने पोहोचता येणार आहे. शिवाय मार्गावर नव्या 10 रेल्वे गाड्या चालवण्याचा पर्यायही खुला राहणार आहे. नवीन प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवासाचा कालावधी 30 मिनिटांनी कमी होणार आहे. म्हणजे जर मुंबईवरून पुण्याला जाण्यासाठी सध्याच्या मार्गाने तीन तासांचा वेळ लागत असेल, तर या नव्याने प्रस्तावित मार्गामुळे हा प्रवासाचा वेळ अडीच तासांवर येणार आहे.
मुंबई ते पुणे दरम्यान रेल्वे मार्गामध्ये लोणावळा आणि खंडाळा हे घाट आहेत. प्रवासी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घाटामध्ये ताशी 60 किलोमीटर अशी वेगमर्यादा मेल एक्सप्रेसला आहे. तर नव्या प्रस्तावित असलेल्या मार्गावर घाट नसल्याने रेल्वे गाड्या ताशी 110 किलोमीटर वेगाने धावू शकणार आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मार्गांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यापैकी एक मार्ग मंजूर झाल्यानंतर त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. ( Karjat to Talegaon & Karjat to Kamshet two new routes proposed by Central Railway between Mumbai to Pune )
असा असेल मार्ग :
प्राप्त माहितीनुसार कर्जत ते तळेगाव दरम्यान 72 किलोमीटरच्या नव्या मार्गावर घाटातील ग्रॅडियंट 1.100 होणाऱ्या सध्या लोणावळा घाटात 1.37 ग्रेडियंट होणार आहे. त्यामुळे अतिरिक्त इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही. कर्जत ते तळेगाव हे अंतर 57 किलोमीटर असून नव्या मार्गात अंतर 72 किलोमीटर पर्यंत पोहोचेल. कर्जत ते कामशेत दरम्यान सध्या 44 किलोमीटर अंतर असून या नव्या मार्गानुसार 62 किलोमीटर अंतर असणार आहे. घाटाऐवजी पर्वतरांगांना वळसा घालावा लागणार असल्याने नव्या मार्गात अंतर अधिक आहे. मात्र नव्या मार्गावरून जादा वेगाने जाता येणार आहे. यातील पहिला मंजूर मार्ग चार वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती मिळत आहे.
अधिक वाचा –
– पीएम-किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 698 कोटी 70 लाख रुपये जमा
– मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांना होणार लाभ
– नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे ; राज्य सरकारचे अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर