Dainik Maval News : कोथुर्णे येथे अपहरण, लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणातील सात वर्षीय मृत पीडित मुलीच्या परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपयांची मदत मंजूर झाली असून त्याबाबतचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील कोथुर्णे या गावात घडलेली ही संतापजनक घटना 3 ऑगस्ट 2022 रोजी उघडकीस आली. या प्रकरणाचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते. पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात करण्याची मागणी आमदार शेळके यांनी विधानसभेत केली होती. त्यानुसार सुनावणी होऊन तेजस दळवी या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतरही मृत पीडित मुलीच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आमदार शेळके यांनी मागणी केली. त्याला यश मिळाले असून मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.
कोथुर्णे येथे 2 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी ही धक्कादायक घटना घडली होती. त्या दिवशी नागपंचमीच्या निमित्ताने शाळेला सुटी असल्याने चिमुकली घरासमोर खेळत होती. अचानक ती बेपत्ता झाल्याने गावात शोधाशोध सुरु झाली. पोलिसांनी गावात शोधमोहिम राबविली. दुसऱ्या दिवशी (3 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे झुडुपात या मुलीचा मृतदेह आढळला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला.
पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत 24 तासांच्या आत चिमुकलीच्या शेजारी राहणाऱ्या तेजस दळवीला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 376, 376 ए, 376 एबी, 302 आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम चार व पाचनुसार गुन्हा सिद्ध झाला. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले. राज्याला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी घेत विशेष न्यायाधीश बी.पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला. ( 5 lakhs from the Chief Minister’s Assistance Fund to the family of the victim girl in Kothurne Maval )
या प्रकरणातील आरोपीला शिक्षा झाली आहे. स्वराच्या परिवाराला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक आधार देता आला, याचे समाधान आहे. अशा भावना आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केल्या.
अधिक वाचा –
– महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे । Lonavala News
– ‘प्रसाद गोसावी’ अवयवदान करणारा पहिला पत्रकार ! मृत्यूशी झुंज अपयशी पण… अजूनही धडधडतंय हृदय ! Pune News
– स्पर्धात्मक युगाचे आव्हान पेलणारा विद्यार्थी घडविणे ही काळाची गरज – आमदार सुनिल शेळके