Dainik Maval News : राज्य विधानसभेच्या निवडणूका आता अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रियांनुसार राज्यात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूका होऊ शकतात, याचा अर्थ ऑक्टोबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे निवडणूकीसाठीचा कालावधी दिवसेंदिवस कमी होत असताना दुसरीकडे इच्छुकांची जोरदार तयारी देखील सुरू आहे. खासकरुन राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटकपक्षात जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच असलेली दिसते. यातही मावळ विधानसभेत ही परिस्थिती अधिक तीव्र आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सुनिल शेळके दुसऱ्या टर्मसाठी तयारीत –
मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार तथा महायुतीच्या घटकपक्षातील राष्ट्रवादीचे आमदार सुनिल शेळके हे त्यांच्या आमदारकीच्या दुसऱ्या टर्मसाठी इच्छुक असून तशी तयारी त्यांनी सुरू केल्याचे दिसत आहे. अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले सुनिल शेळके यांचे तिकीट अजितदादांनी जवळपास निश्चित केल्याची चर्चा आहे. परंतु महायुती कडून अद्याप कोणत्याची जागेची घोषणा करण्यात आलेली नाही. तरीही महायुतीचे उमेदवार म्हणून त्याहीपेक्षा राष्ट्रवादीचे विद्यमान आणि ताकदवर आमदार म्हणून सुनिल शेळके हे दुसऱ्या टर्मसाठी रिंगणात उतरतील हे जवळपास पक्के मानले जात आहे.
रवी भेगडे, बापूसाहेब भेगडे यांचीही तयारी –
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपाने वडगाव मावळ येथील कार्यकर्ता मेळाव्यात मावळ विधानसभेचे रणशिंग फुंकले होते. प्रसंगी बंडखोरीची तयारी देखील भाजपाची असल्याचे वक्तव्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केले होते. तेव्हापासून भाजपाचे विधानसभा प्रमुख रवींद्र भेगडे हे जोषाने विधानसभेच्या तयारीला लागलेले दिसत आहेत. गावभेट दौरा, गणेशमंडळ भेटी यांतून त्यांनी मतदारसंघ बांधणीला सुरूवात केली असून महायुती रवींद्र भेगडेंमुळे मावळच्या जागेसाठी भाजपा आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच होणार, हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
- दुसरीकडे, अजित पवार यांचे जुणेजाणते सहकारी तसेच मावळ राष्ट्रवादीचा चेहरा असलेले बापूसाहेब भेगडे हे आपल्या 2009 च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी तसेच आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रिंगणात उतरणार असल्याचे दिसत आहे. आपण राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार, आपण इच्छुक आहोत, असे स्वतः बापूसाहेब भेगडे यांनी सांगितले आहे. याचा अर्थ सुनिल शेळके यांच्या उमेदवारीच्या आड महायुतीत फक्त भाजपा नाही, तर स्वपक्षातील अनेक इच्छुक आहेत, असे दिसते.
एकूणच मावळ विधानसभेत महायुतीत आमदारकीच्या उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोणतीही हालचाल दिसत नसली तरीही खासदार श्रीरंग बारणे यांचा पाठींबा कोणाला असणार, तेही पाहावे लागेल. तुर्तास महायुतीचा मेंबर होण्यासाठी मावळात अनेक नंबर असल्याचे दिसत आहे. ( Maval Vidhan Sabha Election Preparation of MLA Sunil Shelke Ravindra Bhegde and Bapu Bhegde )
अधिक वाचा –
– प्रत्येक ग्रामपंचायत आणि शाळांनी शालेय गड किल्ले बनविण्याच्या स्पर्धेत सहभाग घ्यावा – पुणे जिल्हाधिकारी
– वडगाव शहरातील मंडल अधिकारी व तलाठी अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण । Vadgaon Maval
– आढले खुर्द येथे 3 लाख 94 हजार रुपये निधीतून होणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन । Maval News