Dainik Maval News : मावळची जनता आमदार सुनील शेळके यांना काहीही कमी पडू देणार नाही, असंच आमचं ठरलंय, तालुक्यात केलेली ४,१५८ कोटींची विकास कामे, हीच तुमची ओळख आहे, मागीव ५ वर्षात आम्ही फक्त तुमचाकडे मागतोय. आता वेळ आपली आहे, आपण त्यांना आता भरभरून मते देऊन निवडून आणूयात, असे आवाहन संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक महादूबुवा कालेकर यांनी केले.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार सुनील शेळके यांचा पवन मावळ पश्चिम विभागाचा विजयी संकल्प मेळावा पवनानगर येथे झाला. त्यावेळी कालेकर बोलत होते. व्यासपीठावर आमदार शेळके, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा दीपाली गराडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश ढोरे, सरपंच खंडूअण्णा कालेकर तसेच सुरेखा काळे, दादासाहेब वाघमारे आदी पदाधिकारी, महायुतीचे कार्यकर्ते व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महादूबुवा कालेकर म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत दमदाटीला, धमक्यांना, लोभाला बळी पडू नका. आपण केलेल्या कामाच्या जोरावर हक्काने महायुतीची उमेदवारी मिळवली आहे आणि आपण पक्षाचे तसेच महायुतीचे काम करतोय, हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
आमदार शेळके म्हणाले की, समोरच्या उमेदवाराला कोणत्याही पक्षाचा अधिकृत पाठिंबा निश्चित नाही, नंबर नाही, व्हिजन नाही, अजेंडा नाही, फक्त सुनील शेळकेला विरोध एवढाच त्यांचा अजेंडा आहे. उगाच दम देत लोकांना दमदाटीचे फोन करायचे. रात्री अपरात्री २-३ वाजता घरी जायचे. सोशल मीडिया वरील स्टेटस डिलीट करा, कॉमेंट करू नको, नाहीतर आमच्याशी गाठ आहे, हे विसरू नका, अशी धमकी द्यायची. मावळची जनता ही दहशत सहन करणार नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मुलाखत बघा. ते सुद्धा बोलले की ‘त्यांचे व्यक्तिगत वैर आहे’ म्हणून मी विनंती करतो की, हे असा दादागिरी, भाईगिरी, खुनशीचे राजकारण करू नका, आता मावळची जनता ऐकून घेणार नाही, असे शेळके म्हणाले.
माझ्या आई- बहिणींनी कधी हॉटेल पहिले नव्हते, समुद्र किनारा पहिला नव्हता. त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न केला तर विरोधकांच्या पोटात दुखत आहे. यावेळी आमदार बनवा, तुम्हाला थेट विमान प्रवासाचा आनंदही देतो, असे शेळके म्हणाले.
दिपाली गराडे म्हणाल्या की, “ यावेळी सुनील अण्णांचे मताधिक्य एक लाख पार होणार हे नक्की! आमचा लाडक्या भावाला एकटा पडलं म्हणून मी आणि सर्वच महिलांनी असा निश्चय केलाय की, या वेळी संपूर्ण ताकद लावून सुनील अण्णांना विक्रमी मताधिक्याने निवडून देऊ.”
सुनील अण्णांना परत विधान सभेत पाठवण्याची आतुरता, उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि ही भावना मनातून प्रेम असेल तरच चेहऱ्यावर येते. म्हणजेच येथे कोणी खोटा नाही. प्रत्येकजण खरा आहे, असे गणेश खांडगे म्हणाले.
विजयी संकल्प मेळाव्यापूर्वी आमदार शेळके यांचे प्रचंड उत्साह व जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘बच्चा बच्चा कहता है, सुनील अण्णा सच्चा है’, ‘सुनील अण्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘आमचं मत मावळच्या विकासाला’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– बापूसाहेब भेगडे यांच्या सदिच्छा भेटीत तरुण कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद । Bapu Bhegade
– निवडून आल्यास कुणाला पाठींबा देणार? बापूसाहेब भेगडे यांना समर्थन देणाऱ्या महाविकासआघाडीतील नेत्यांमध्ये संभ्रम
– आमदार सुनिल शेळके यांच्या ‘रेकॉर्ड ब्रेक’ विजयासाठी महायुतीचा नियोजनबद्ध प्रचारावर भर । Sunil Shelke