Dainik Maval News : आज १४ फेब्रुवारी अर्थात व्हॅलेंटाईन डे. जगभरातील प्रेमविरांसाठी आजचा दिवस अत्यंत खास. आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठीचा तर हा खास दिवस असतो. यामुळे आजच्या दिवशी प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या गुलाब पुष्पाला विशेष मागणी असते व हीच मागणी लक्षात घेऊन गुलाब फुल उत्पादक चार ते पाच महिने विशेष कष्ट घेत, वातावरणाशी झुंजत गुलाबाचा मळा फुलवितात. तादळानंतर मावळ तालुका हा गुलाब उत्पादनासाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. आज जेव्हा व्हॅलेंटाईन डे प्रत्यक्ष साजरा होत आहे, तेव्हा फक्त स्थानिकच नाही तर जगभरातील बाजारपेठांमध्ये मावळच्या मातीतला गुलाब विक्रीसाठी आलेला दिसतो. ह्याच गुलाब विक्रीतून मावळातील अनेक शेतकऱ्यांचे जीवन सुधारले असून त्यांच्यासाठी आजचा दिवस दिवाळीपेक्षा काही कमी बिलकूल नाही.
आज जेव्हा जगभरातील तरूण हातात गुलाबाचं फूल घेऊन आपलं प्रेम व्यक्त करीत आहे, तेव्हा ह्या गुलाबाला मावळच्या मातीचा गंध असलेला दिसतो. मावळ तालुक्यातील गुलाब हा फक्त पुणे, मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू, अहमदाबाद, हैद्राबाद याच शहरात नाही तर अगदी जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, यूरोप आणि दुबईच्या बाजारात दाखल झाला आहे. गुलाबातही रेड रोज अर्थात लाल रंगाचे गुलाब हे प्रेमाचे अस्सल प्रतीक आणि मावळातील हाच गुलाब आज जगभरातील बाजारपेठांत उपलब्ध आहे.
- मावळमधील एकूण गुलाब उत्पादनापैकी जवळपास ३५ ते ४० लाख गुलाब परदेशात विक्री करण्यात आला आहे. स्थानिक बाजारपेठेत ६० ते ६५ टक्के गुलाब विक्री झाल्याचे गुलाब उत्पादकांनी सांगितले. व्हॅलेंटाईन डे हा जगभर साजरा केला जात असल्याने मावळातील गुलाबांना जगभरातील बाजारपेठा खुणावत आहेत. यातून मावळातील काही गुलाब फूल उत्पादकांकडून थेट परदेशात गुलाब पाठविण्यात आले आहेत. मावळातून जवळपास एक कोटी गुलाब निर्यात झाल्याची माहिती समोर येत आहे. गुलाब निर्यातीच्या बाबत मावळ तालुका हा राज्यात प्रथम स्थानी असलेला दिसतो. ( Maval taluka First in rose export in Maharashtra Valentine Day Special )
गुलाबाचे उत्पादन फक्त मावळात होते असे नाही, तर इतरही ठिकाणी होते. परंतु चांगल्या दर्जाचा गुलाब म्हणून मावळातील गुलाबांना विशेष पसंती आहे. गुलाब फुलाची प्रतवारी ही लांबीनुसार ठरली जाते. साधारण ५० ते ६० सेंटीमीटरच्या गुलाब फुलांना अधिक मागणी असते. याच प्रतवारीनुसार फुलाचे बाजारपेठेत भाव ठरतात. स्थानिक बाजारपेठेत यंदा या गुलाबाला १४ ते १६ रूपये दर मिळाला असून परदेशात यापेक्षा १ ते २ रूपयांनी कमी दर आहे.
सर्वाधिक पसंती मिळालेले गुलाब
‘व्हॅलेंटाईन डे’ला ‘डच फ्लॉवर’ प्रजातीतील लाल रंगाच्या टॉपसिक्रेट, बोरडेक्स, फॅशन, सामुराई, कप्परक्लास, ग्रीनगला, फस्टरेड गुलाबांना सर्वाधिक मागणी असते. त्याखालोखाल पिवळ्या रंगाच्या गोल्डस्ट्राईक, गुलाबी रंगाच्या रिव्हायव्हल, पॉईजन, ऑरेंज (नारंगी) रंगाच्या ट्रॉफीकल अमेजॉन, झाकिरा, पांढऱ्या रंगाच्या अविलॉंस या फुलांना अधिक पसंती असते. जपान, हॉलंड, थायलंड, अमेरिका, फ्रांस, जर्मनी, इग्लंड, जपान, दुबई व इथोपिया येथील आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसह पुणे, मुंबई, दिल्ली, बेंगळूर, अहमदाबाद, बडोदा, जयपूर, लखनौ, जबलपूर, पाटणा, कोलकता, भोपाळ, इंदोर, सुरत, हैद्राबाद व गोवा अशा स्थानिक बाजारपेठांमध्येही मोठी मागणी आहे.
तीन वर्षात गुलाब शेतीत वाढ
मावळात साधारणतः ५०० हेक्टर क्षेत्रावर गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. यात मागील तीन वर्षात २०० हेक्टर क्षेत्राची भर पडली आहे. पूर्वी जिथे पालेभाजा पिकविल्या जात होत्या, तिथेच आता गुलाबाचे मळे फुलविले जात आहेत. गुलाब शेतीला पोषक वातावरण असल्यामुळे व चांगले पैसे हाती लागत असल्याने अनेक शेतकरी गुलाब उत्पादनाकडे वळत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– चालकाचे प्रसंगावधान, दुचाकीस्वारांची मदत अन् पोलिसांची सतर्कता ; देहूरोड येथे पेटलेल्या ट्रकचा सिनेस्टाईल थरार । Dehu Road News
– दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ग्रेस गुण अर्ज ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे 10 मार्च पर्यंत स्वीकारले जाणार
– सेवा रस्त्यालगतच्या व्यवसायिकांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ; रस्त्यात वाहने उभी केली जात असल्याने नागरिक त्रस्त