Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून घेतली जाणारी दहावीची परीक्षा शुक्रवार (दि. 21 फेब्रुवारी) पासून राज्यभरात सुरू झाली. यंदा राज्यात दहावी परीक्षेला 16 लाख 11 हजार 610 विद्यार्थी बसले असून 5 हजार 130 केंद्रांवर परीक्षा होत आहे. मावळ तालुक्यात एकूण 7 हजार 47 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षा देत असून 114 केंद्रावर शुक्रवारी परीक्षा सुरळीतपणे सुरु झाली.
इयत्ता दहावी अर्थात एसएससी बोर्ड परीक्षेला मावळ तालुक्यातील 14 केंद्रावर सुमारे 7 हजार 47 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. अतिशय शिस्तीत व शांततेत तालुक्यात दहावीची परीक्षा सुरू झाल्याचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी सांगितले. तालुक्यात 82 माध्यमिक शाळा असून या शाळांमधून सुमारे 7 हजार विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेस प्रविष्ट झाले आहेत. देहूरोड, तळेगाव, वडगाव,कामशेत, लोणावळा, पवनानगर, चांदखेड, टाकवे आदी केंद्रावर शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता परीक्षा सुरू झाली.
- विद्यार्थ्यांना परीक्षेला सोडण्यासाठी त्यांचे पालक, मित्र, काही शाळांचे शिक्षक केंद्रावर जमा झाले होते. मुलांच्या चेहऱ्यावर भीतीयुक्त आनंद होता. तर पालक विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश करेपर्यंत धीर देत होते. परीक्षा केंद्रात कोणतेही पालक अथवा बाहेरून आलेल्या शिक्षकाला प्रवेश दिला जात नव्हता. परीक्षा केंद्रावर पिण्याचे पाणी, वीज, वैद्यकीय सेवा पुरविण्यात आलेली होती. प्रत्येक केंद्रावर त्या त्या परीक्षा केंद्राचे प्रमुख हे विद्यार्थ्यांना हसतमुखाने स्वागत करत होते आणि धीर देत होते.
कामशेत केंद्रावर परीक्षा –
कामशेत केंद्रावर एकूण 697 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे स्वागत करून परीक्षेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कामशेत केंद्र संचालक धनश्री साबळे, मुख्याध्यापक संजय वंजारे, बापूराव नवले उपस्थित होते. तसेच, परीक्षा कॉफी मुक्त व्हावी यासाठी कॉपी मुक्त अभियान अंतर्गत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चांदखेड केंद्रावर परीक्षा –
चांदखेड येथील न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत करीत परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावर चांदखेड येथील १६६, आढले बुद्रुक २१,आढले खुर्द २०, परंदवडी ३५, साळुंब्रे ७९, दारूंब्रे २९, शिरगाव ३६, सोमाटणे ३३, बेबड ओहोळ २९ असे एकूण ४४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. शुक्रवारी मराठी विषयाचा पहिला पेपर असल्याने विद्यार्थ्यांचे खास स्वागत करीत परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश