Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीने येत्या 31 मार्चपर्यंत 100 टक्के मिळकत कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले असून करवसुलीसाठी दंडात्मक तसेच नळजोड तोडण्याची कारवाई सुरू केली आहे. वर्षानुवर्षे थकबाकी असलेल्या मिळकती जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वडगाव नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
वडगाव नगरपंचायतीची घरपट्टी कराची वार्षिक मागणी 9 कोटी रुपये असून आतापर्यंत त्यापैकी 2 कोटी 85 लाख रुपये वसुल झाले आहेत. तसेच पाणीपट्टी कराची वार्षिक मागणी 9 कोटी 46 लाख रुपये असून आतापर्यंत त्यापैकी 60 लाख रुपये कर वसुली झाली आहे. दोन्ही मिळून अद्याप 7 कोटी रुपये कर येणे बाकी आहे.
- चालू आर्थिक वर्ष संपत आल्याने नगरपंचायतीने 31 मार्चपर्यंत शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कर वसुलीसाठी पाच पथके तयार करण्यात आली असून ती घरोघरी जाऊन नागरिकांना कर भरण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. फिरत्या गाडीतून ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सद्यस्थितीमध्ये ज्या मिळकत धारकांची थकबाकी आहे, त्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. थकबाकीदारांचे नळजोड तोडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीवर दोन टक्के दंड लावण्यात येणार आहे.
कर भरण्यासाठी सुविधा
मिळकत धारकांना सुट्टीच्या दिवशीही म्हणजे शनिवार व रविवार या दिवशीही नगरपंचायत कार्यालयात येऊन कर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मिळकतधारक ऑनलाइन पद्धतीनेही कर भरू शकतात. त्यासाठी बिलावरील क्यूआर कोड स्कॅन करून व www.npvadgaon.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आदींचा वापर करून कर भरणा करता येईल.
कर बिलाबाबत तक्रार असल्यास नगरपंचायत कार्यालयात अर्ज देऊन तत्काळ बिल दुरुस्ती करून देण्यात येत आहे. यासाठी कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले आहे.
वडगाव शहराचा सर्वांगीण विकास तसेच पाणी, रस्ते, पथदिवे आदी सोयी सुविधा पुरविण्यासाठी नागरिकांनी कर भरून सहकार्य करावे. नगरपंचायतीला कोणावरही कारवाई करण्याची इच्छा नाही. परंतु वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद न देणाऱ्या मिळकतधारकांवर नाईलाजाने कारवाईचा बडगा उगारावा लागत आहे. नागरिकांनी त्वरित कर भरणा करून नगरपंचायतीस सहकार्य करावे व कटुता टाळावी. – डॉ. प्रवीण निकम, प्रशासक तथा मुख्याधिकारी वडगाव नगरपंचायत
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक