Dainik Maval News : संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे विविध प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत. यातही मागील काळातील शिंदे-फडणवीस सरकार व आता नव्याने स्थापन झालेले महायुती सरकार यांच्या काळात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अनेक आश्वासनांची पूर्तता झाली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारपासून सुरु झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्यकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि.३) संपूर्ण राज्यभरात काँग्रेस (आय) पक्षाकडून आंदोलन करण्यात आले.
- मावळ तालुक्यातही काँग्रेस (आय) पक्षाने राज्यभरातील व विशेषतः स्थानिक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत वडगाव मावळ येथे तीव्र आंदोलन केले. काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या नेतृत्वात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांनी श्री पोटोबा महाराज मंदिर ते तहसील कार्यालय असा पायी मोर्चा काढला, यानंतर तहसीलदार विक्रम देशमुख यांची भेट घेऊन त्यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन सादर केले.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापासून काढण्यात आलेल्या मोर्चात काँग्रेसच ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर, तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, बाळासाहेब ढोरे, अॅड. खंडूजी तिकोने, राजू शिंदे, राजेश वाघोले, महादू खांदवे, रुपाली क्षीरसागर, वैशाली फाटक आदींसह कार्यकर्ते सहभागी होते
राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांवर अत्याचार वाढत आहेत. युती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता अजूनही करण्यात आलेली नाही. मावळ तालुक्यात आजही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून सत्ताधारी फक्त आश्वासन देत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी कोपरा सभेत केला.
तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रलंबित लाभार्थ्यांना न्याय द्यावा, पवना धरणग्रस्त व तालुक्यातील इतर धरणग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, भूखंडाचे वाटप तातडीने करावे. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना तातडीने सुरू कराव्यात. भूमी अभिलेख कार्यालयातील शेतकऱ्यांची कामे, मोजणीची प्रकरणे मार्गी लावावीत आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात ‘पुष्पा’चा कंटेनर पकडला ; शिरगावजवळ कोट्यवधीचे रक्त चंदन जप्त, आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा पर्दाफाश
– संत तुकाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगूल वाजले ! आजपासून निवडणूक प्रक्रिया सुरू – वाचा सविस्तर
– दिलासादायक : तळेगाव-चाकण-शिक्रापूर परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार, विकास प्रकल्पांसाठी राज्य सरकार सकारात्मक