Dainik Maval News : पावसाळा सुरू होण्यापूर्वी जी पूर्वतयारी, नियोजन करणे आवश्यक आहे, त्याची पूर्तता लोणावळा नगरपरिषद प्रशासन, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आणि लोणावळा शहर पोलीस यांनी करून घेत लोणावळा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी लोणावळा नगर परिषदेचे माजी नगरसेवक, भाजपाचे गटनेते देविदास कडू यांनी केली आहे.
लोणावळा आणि परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस कोसळत आहे. दरम्यान, सात जून पासून मान्सून सक्रीय होण्यास सुरुवात होते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी लोणावळा शहरातील सर्व नाले, इंद्रायणी नदीपात्र आणि अंतर्गत ड्रेनेज यांची साफसफाई, स्वच्छता नगरपरिषद प्रशासनाने करून घ्यावी, अशी मागणी देविदास कडू यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यासोबत, लोणावळा शहरात विविध ठिकाणी स्ट्रीट लाइट बंद आहेत. त्याची तात्काळ दुरुस्ती करून घेण्यात यावी, ज्या लाइटच्या तारा रस्त्यावर लोंबल्या आहेत त्यांची तात्काळ दुरुस्ती करून त्या उंच करून घ्याव्यात, अशी देखील मागणी कडू यांनी नगरपरिषद आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्याकडे केली आहे.
पावसाळा आणि वाहतूक कोंडी ही लोणावळा शहरातील मागील अनेक वर्षांची समस्या आहे. पोलीस प्रशासनाने लोणावळा शहरामधील तसेच मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आताच कृती आराखडा तयार करून त्यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लेखी स्वरूपात कडू यांनी लोणावळा शहर पोलिसांकडे केली आहे.
रस्ते, वाहतूक, वीज वितरण व्यवस्थेबाबत सूचना
शहरात वाहने उभी करण्यासाठी ज्या ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी तात्पुरत्या वाहन तळाची निर्मिती करावी. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ज्या ठिकाणी डायव्हर्सन्स आवश्यक आहेत. त्या ठिकाणी ड्रायव्हर्सन्स देण्यात यावेत. वीज वितरण कंपनीच्या डीपींची अनेक ठिकाणी झाकणे तुटलेली आहेत. या तुटलेल्या झाकणाच्या डीपीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडांच्या फांद्या आल्या आहेत, त्या फांद्या तोडून पावसाळ्यात दुर्घटना घडणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– खरीप हंगाम तोंडावर, कृषी सहाय्यक संपावर ! बळीराजा आणि कृषी विभागातील संपर्क तुटला । Maval News
– तळेगाव आगारातून सुटणारी तळेगाव दाभाडे ते विलेपार्ले बस पुन्हा सुरू करण्याची मागणी । Talegaon Dabhade
– खादी ग्रामोद्योग संघ मावळ तालुक्यात ‘पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान’ योजना प्रभावीपणे राबविणार । Maval News
– जमिनीच्या वादातून शेजाऱ्यांकडून एकाला बेदम मारहाण ; आंबळे गावातील घटना । Maval News