Dainik Maval News : दसरा – दिवाळी सण घरी उरकल्यानंतर घाटावरील मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्यांचा वाडा घेऊन ओल्या चाऱ्याच्या आणि पाण्याच्या शोधात भटकंती सुरू करतात. त्यांची ही भटकंती कोकणात खलाटी पर्यंत सुरू असते. गावोगावी मुक्काम करीत आपल्या लेकरासारख्या शेळ्या मेंढ्यांचे पोट भरत मेंढपाळ फिरत असतात.
- साधारण दिवाळी झाल्यानंतर कोकण दिशेने सुरू झालेला त्यांचा प्रवास पाऊसाची चाहूल लागताच संपतो. मिरगाची चाहूल लागताच मान्सून सुरू होण्याआधी आपलं घर गाठण्यासाठी ते पुन्हा घाटाखालून घाटावर येण्यासाठी परतीचा प्रवास सुरू करतात. पिढ्यानपिढ्या आणि वर्षोनवर्षे हीच वाट चालणारे मेंढपाळ धनगर पूर्वजांची परंपरा आणि पोटपाण्याचा हा व्यवसाय विनातक्रार करीत आहे.
वर्षानुवर्षांच्या वाटचालीने गावोगावची माणसे त्यांनी आपलीशी केली आहेत. त्यामुळे ज्या गावात त्यांचा वाडा उतरतो तिथे त्यांना गावकरी, ओळखी पाळखीचे लोकं आवडीने विचारपूस करून ठेवून घेतात. असाच हा प्रवास कोकणात आतपर्यंत होतो. पुन्हा माघारी जाताना वेगळा रस्ता, वाटेत वीर शिंग्रोबाचे दर्शन घेऊन हे मंडळी बारामती, सुपा भागात परततात. सध्या मावळ प्रांतात माघारी निघालेल्या मेंढपाळांचे आणि त्यांच्या शेळ्या-मेंढ्यांच्या वाड्यांचे दर्शन होत आहे.
‘आम्ही मूळ बारामतीतले. दरवर्षी वाडा घेऊन कोकणात उतरतो. शेळ्या मेंढ्यांना चारा मिळावा आणि चार पैशांचा व्यवसाय व्हावा यासाठी बारामती ते कोकण प्रवास करतो. आता पाऊस सुरू होईल, त्याआधी घर गाठायचं म्हणून परतीचा प्रवास सुरू केलाय. दिवाळीनंतर घर सोडतो, त्यानंतर पावसाच्या आधी घरी जायचं असतं.’ – भिवा पिंगळे, बारामती
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन