Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मान्सूनआधी पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला. ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. बैठकीस एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि अधिकारी उपस्थित होते.
- मुंबई – नाशिक महामार्गाचा आढावा घेऊन महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मान्सूनपूर्वी ज्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होणार नाही त्याचे डांबरीकरण करून रस्ता वाहतूक करण्यास योग्य बनवावा, या मार्गावरील 31 किलोमीटरचे काँक्रीटीकरण होणे अद्यापही बाकी आहे, तसेच पिंपळास चारोटी, रेल्वे ओव्हर ब्रिज येथील काम रखडले आहे या कामांना तत्काळ गती द्यावी, कंत्राटदार ही कामे वेळेत पूर्ण करण्यास हयगय करत असल्यास त्यालाही नोटीस पाठवून ताकीद द्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रेल्वे पुलाच्या कामासाठी गर्डर आल्यानंतर तत्काळ रेल्वेकडून मेगाब्लॉक मागून घ्यावा आणि हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण करावे. या महामार्गावरील कशेळी येथील खाडीवरील पुलाचे काम ऑक्टोबरपर्यंत तर कळवा येथील खाडी पुलाचे काम जूनअखेर पूर्ण होणार आहे. येत्या पावसाळ्यात ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक सुरळीत व्हायला हवी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची मिसिंग लिंक डिसेंबर अखेर होणार पूर्ण –
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वात अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असल्याने ते नियोजनबद्धरित्या पूर्ण करावे असे त्यांनी सांगितले. तसेच हे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होईल.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा महामार्ग सहा ऐवजी दहा मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीच्या विचाराधीन असून फिरायला जाणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी हे काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पुणे रिंगरोडच्या कामात बाधित होणाऱ्या 10 हजार झाडांचे पुनर्रोपण करणार –
पुणे रिंगरोडचे कामही सुरू झाले असून, यात एकूण १२ पेकेजेस आहेत. यातील नऊ पेकेजेसची कामे सुरू झाली आहेत. या रिंग रोडच्या कामात बाधित होणाऱ्या दहा हजार झाडांचे पुनर्रोपण होणार आहे. यातील चार हजार झाडांचे पुनर्रोपण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून जून महिन्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– जिल्हाधिकाऱ्यांकडून मावळच्या सर्वांगीण विकासाला गती ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक
– पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील 15 ‘ब्लॅक स्पॉट’ची दुरुस्ती । Pune Mumbai Highway