Dainik Maval News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील सेंट्रल चौक, घोरावाडी डोंगर पायथा, सोमाटणे फाटा खिंड, लिंब फाटा, सीआरपीएफ कॅम्प, वडगाव फाटा या ठिकाणी मागील गेल्या दोन ते तीन वर्षांपासून दिवस-रात्र वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या असलेल्या दिसत आहेत. हा खुलेआम सुरू असणारा वेश्या व्यवसाय बंद करावा, अशी मागणी जागरूक नागरिक वारंवार करीत आहेत.
सोमाटणे फाटा खिंड, सीआरपीएफ कॅम्प, वडगाव फाटा याठिकाणी तर वेश्या व्यवसाय करणाऱ्या ठराविक चार ते पाच महिला सकाळी सात-आठ वाजलेपासून उभ्या असतात. तोंडावर मास्क लावून ‘सावज’ हेरणाऱ्या ह्या महिलांना पाहून मार्गाने ये-जा करणाऱ्यांची मोठी कुचंबना होते. दुचाकीवरून जाणारी कुटुंबे लहान मुलांची तोंडे फिरवतात, तर सामान्य महिलांची मोठी कुचंबना होते.
- अनेकदा आंबटशौकीन कुतुहलापोटी ह्या महिलांना पाहून अचानक वाहन थांबवितात, यामुळे आजवर अनेकदा अपघात झाले आहेत. पुणे-मुंबई महामार्गावर जिथे जिथे ह्या महिला उभ्या असतात, तिथून काहीएक अंतरावर पोलीस ठाणे आहे. दिवसभर पोलीस अन् त्यांची वाहने या मार्गावरून ये-जा करीत असतात. परंतु पोलिसाकडून या महिलांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसते. पोलिसांची ही वागणूक संशयास्पद असून सामान्य नागरिकांना अनाकलनीय अशी आहे. पोलिसांचे यात अर्थपूर्ण संबंध आहेत की काय, असा प्रश्न यातून निर्माण होतो.
सायंकाळच्या सुमारास वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची संख्या भलतीच वाढते. शौकीन देखील भराभर येऊ लागतात. यातून कळपाकळपाने दिसणारे हे दृश्य सर्वसामान्य नागरिकांना सामजिकदृष्ट्ट्या अहिताचे वाटत असते, परंतु ते रोखण्याचे धाडस किंवा अधिकार त्यांच्याकडे नसतात. परंतु ज्या पोलीस प्रशासनाकडे हे अधिकार आहेत, ते दोन – तीन वर्षात फोफावलेल्या या धंध्याकडे का दुर्लक्ष करीत आहेत? हा मोठा प्रश्न आहे. नाही म्हणायला जिथे या महिला उभ्या असतात, तिथे पोलिसांच्या गाड्या रात्रीच्या वेळी जातात. परंतु अनेकदा पोलिस पुढे निघून गेले आणि वेश्या व्यवसाय करणारी महिला तिथेच उभी राहिल्याचे चित्र पाहण्यात आले आहे.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत अनेक लॉज आहेत. महामार्गावर जिथे ह्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या असतात, त्यांना तिथूनच गाडीवर किंवा कारमध्ये बसवून या लॉजमध्ये नेले जाते. दिवस रात्री हे समान दृष्य दिसते. अशावेळी हाकेच्या अंतरावर वाहतूक नियमन करणारे पोलीस, गाड्या अडवून चलन फाडणारे पोलीस, सीआरपीएफ कॅम्पातील चौकीतून परिसरावर लक्ष ठेवणारे जवान असे हे समाजातील चुकीच्या गोष्टींना आळा घालणारे ‘रक्षक’ असताना, अवैध आणि चुकीच्या पद्धतीने फोफावलेल्या या वेश्या व्यवसाकडे मात्र ठरवून दुर्लक्ष करीत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय आणि संताप व्यक्त होत आहे.
ज्या ज्या ठिकाणी ह्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला उभ्या असतात तिथून जवळपासच बस थांबे आहेत. अशावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या नित्याच्या वावराने सामान्य महिला देखील जेव्हा बस थांब्याकडे जात असतात किंवा बस थांब्याजवळ थांबतात, तेव्हा त्यांच्याकडेही विचित्र नजरेने पाहणारे पाहतात. यातून संबंधित महिलेची कुचंबना होती, ही बाब सर्वाधिक गंभीर आहे. संबंधित महिलेला होणारा मानसिक त्रास शब्दात सांगता येणारा नसतो.
- ज्या ज्या ठिकाणी ह्या महिला उभा राहतात, हा संपूर्ण परिसर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे, तर काही भाग पुणे ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील आहे. समाजिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने फोफावत असलेला महामार्गालगतचा हा वेश्या व्यवसाय गेल्या दोन तीन वर्षांत अधिक वेगाने वाढतोय, दिवसेंदिवस वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची येथील संख्या आणि ठिकाणे वाढताहेत. एकीकडे गुन्हेगारी रोखण्यात कमी पडणारे पोलीस प्रशासन जेव्हा समोर उघड्या डोळ्यांनी दिसणारा अवैध वेश्या व्यवसाय देखील थांबवू शकत नाही, तेव्हा निश्चितच पोलिसांच्या भूमिका, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो.
कायद्याचा धाक ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांना उघड्या डोळ्यांनी दिसणारे अवैध धंधे कमी करता येत नाही, तेव्हा पोलिसांबद्दलचा आदर आणि धाक जनतेच्या नजरेतून अपोआप कमी होऊ लागतो. पुणे-मुंबई महामार्गावर दिवसरात्र सुरू असलेला हा वेश्या व्यवसाय याचे उत्तम उदाहरण आहे. आता पोलीस नेमके आपले स्थान लोकांच्या नजरेत काय ठेवू इच्छितात, हे पोलिसांवर अवलंबून आहे. बाकी वेश्या व्यसाय करणाऱ्या महिलांसाठी महामार्ग ही अधिकृत जागा असू शकत नाही, हे सांगायला कायदेतज्ज्ञाची गरज नाही.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यात आमसभा आयोजित करण्याची मागणी ; शिवसेनेकडून प्रशासनाला निवेदन । Maval News
– वडगावातील तरूणाईत वाढत्या व्यसनाधीनतेमागे शहरातील अवैध धंदे ; पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी
– पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी बिगर कर्जदार आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी मुदतवाढ ; जाणून घ्या