Dainik Maval News : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘न्याय आपल्या दारी’ नाविन्यउपक्रमाअंतर्गत फिरत्या लोकअदालतीच्या माध्यमातून एकूण १ कोटी ५४ लाख ७७ हजार ८२ रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली आहे. याद्वारे समाजातील वंचित, गरजू, असहाय्य घटकांना गावातच न्याय मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसून आली तसेच हा उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे त्यांनी आभार मानले.
जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर येथे १२ जून २०२५ रोजी ‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत फिरत्या लोकअदालतीकरिता ‘विशेष मोबाईन व्हॅन’चा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १२ जून रोजी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि कटक मंडळ क्षेत्रात तर दुसऱ्या टप्प्यात २३ जून रोजी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये ‘न्याय आपल्या दारी’ राबविण्यात आला.
यामध्ये दिवाणी व फौजदारी स्वरूपाची एकूण १३० प्रकरणे निकाली काढून एकूण १ कोटी ४९ लाख ४१ हजार ३३२ रुपयांची आणि ३६ पूर्ववाद प्रकरणे निकाली काढून ५ लाख ३५ हजार ७५० रुपये अशा एकूण १ कोटी ५४ लाख ७७ हजार ८२ रुपये इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन : ‘भारतीय न्यायसंस्थेचा आत्मा म्हणजे समावेश आणि संवेदनशीलता आहे, फिरती लोकअदालत म्हणजे लोकशाहीच्या हृदयातून निर्माण झालेली कल्पना आहे. नागरिकांच्या दारी न्याय नेणे, हेच खरे उत्तरदायित्व आहे.’
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव सोनल पाटील : ‘न्याय आपल्या दारी’ उपक्रम केवळ एक न्यायसेवा नव्हे, तर न्यायव्यवस्थेवरील विश्वास प्रस्थापित करणारा पूल आहे. न्याय हा केवळ न्यायलयाच्या चार भिंतींमध्ये मर्यादित न राहता, थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविण्याच्याउद्देशाने उपक्रम राबविण्यात आला आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक, भौगोलिक किंवा माहितीच्या अभावामुळे न्यायापासून वंचित घटकांना न्याय देण्याचे काम करण्यात आले. यामाध्यमातून न्याय प्रक्रिया नागरिकांना समजण्याजोगी, सुलभ आणि विश्वासार्ह करण्यासाठी कटिबद्ध आहोत.’
फिरते लोकअदालत न्यायापासून वंचित घटकांकरिता आशेचा किरण –
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून न्यायप्रक्रियेला समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम करीत आहे. सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश ए. के. पटणी यांच्या मार्गदर्शनाखाली विधी स्वयंसेवक प्रमोद बनसोडे, दत्तात्रय बारभुजे यांनी नागरिकांच्या दारापर्यंत जाऊन जिल्ह्यातील नागरिकांशी थेट संवाद साधून कायदेविषयक जनजागृती करण्याचे काम केले.
फिरते लोकअदालत न्यायापासून वंचित घटकांकरिता एक आशेचा किरण ठरत असून न्यायकार्य अधिक प्रभावी, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने देण्याचे काम करीत आहे. जिल्ह्यात लोकअदालतीच्या प्रभावशाली अंमलबजावणीचे प्रत्यक्ष प्रमाण आहे, न्यायदानासोबतच हा उपक्रम यशस्वी करण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने एका समर्पित भावनेने काम केले.
‘न्याय आपल्या दारी’ हा उपक्रम नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासोबतच त्यांची सहानुभूती आणि त्यांच्याप्रती असलेल्या जबाबदारीच्या भावनेने समृद्ध आहे. आगामी काळातही ‘प्रत्येक व्यक्तीस न्यायाचा अधिकार” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यास प्राधिकरण कटिबद्ध आहेत, असेही श्रीमती पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी
– चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
– मावळमधील आरोग्य सेवांमध्ये पडणार मोठी भर; वडगाव-कान्हे आणि लोणावळा उपजिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा मंजूर