Dainik Maval News : गणेशोत्सवाची सांगता होऊन काही दिवस झाले आहेत. मावळ तालुक्यात बहुतांश ठिकाणी गौरी सोबत गणपतीचे विसर्जन होते. अर्थात यंदा वडगाव, तळेगाव अन्य ग्रामीण भागात २ सप्टेंबरला गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. दरम्यान वडगाव नगरपंचायतीने यंदा मूर्ती संकलन आणि कृत्रित हौदात गणेशमूर्ती विसर्जनाचा उपक्रम राबविला होता, त्याला नागरिकांचाही उदंड प्रतिसाद मिळाला होता. परंतु आज रोजी (दि. १२) उर्से खिंड येथे गणेशमूर्ती आढळून आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
वडगाव नगरपंचायत प्रशासनाने संकलित केलेल्या तथा हौदात जमा झालेल्या गणेशमूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन केले नाही, योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही, तर त्या मूर्ती गाडल्या असून उर्से खिंडीत टाकल्याचा गंभीर आरोप होत आहे. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. परंतु, यावर प्रशासनाने आपली भूमिका मांडली असून वडगाव नगर पंचायतीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रवीण निकम यांनी सदरहू मूर्ती या वडगाव नगरपंचायतीने संकलित केलेल्या नसल्याचे सांगितले आहे, तसेच फोटो व व्हिडिओ व्हायरल न करण्याचे आवाहन केले आहे.
…तर कारवाई करू – मुख्याधिकारी
उर्से खिंडीमध्ये काही समाज माध्यमांद्वारे गणेश मूर्ती आढळून आल्याचे समजते. नगरपंचायत स्तरावर नागरिकांकडून मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणेत आले होते. त्या सर्व मूर्तींचे योग्य प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आलेले आहे. तरी सदर ठिकाणी आढळून आलेल्या व समाज माध्यमाद्वारे प्रसारित फोटो नुसार दिसणाऱ्या मुर्त्या या नगरपंचायत कडील नाहीत. तरी सदर ठिकाणी मुर्त्या आढळून आल्यास तत्काळ विधिवत विसर्जन नप कडून करणेत येईल. तरी समाज माध्यमाद्वारे किंवा इतर माध्यमातून धार्मिक भावना दुखावतील असे फोटो अगर माहिती कृपया प्रसारित करू नये, ही नगर पंचायत वडगाव कडून नम्रपणे विनंती करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणी चौकशी करून कुणी दोषी असल्यास कारवाई करू., अशी प्रतिक्रिया डॉ. निकम यांनी दिली आहे.
हेही वाचा – महत्वाची बातमी ! विसर्जनानंतर गणेश मूर्तींचे छायाचित्रण व प्रसारणास मनाई ; पुणे शहर पोलीस उपआयुक्तांचा आदेश
नागरिकांच्या प्रतिक्रिया :
रुपेश म्हाळसकर (मनसे नेते) – ज्या ठेकेदाराला वडगाव नगर पंचायतीने गणेशमूर्तींचे व्यवस्थापन करण्याचे कंत्राट दिले होते, त्या ठेकेदाराने मूर्तींचे विधीवत विसर्जन न करता, नागरिकांच्या भावना दुखावतील अशा पद्धतीने त्या कचऱ्यात फेकल्या आहेत. आम्ही स्वतः स्थळ पाहणी केली असून मूर्ती गाडलेल्या आढळून आल्या आहेत. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी आहे, अन्यथा आम्ही नगर पंचायतीवर मोर्चा काढू.
विशाल वहिले (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष) – नगर पंचायत प्रशासनाने या घटनेची चौकशी करावी. दोषी ठेकेदारावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा. नागरिकांच्या धार्मिक भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत. तसेच, सध्या तिथे असलेल्या गणेश मूर्तींचे व्यवस्थापन तथा विसर्जन करण्याची परवानगी प्रशासनाने आम्हाला द्यावी. आम्ही जय मल्हार ग्रुपकडून गणेश मूर्तींचे शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करू.
मंगेश खैरे (सामाजिक कार्यकर्ते) – सामान्य गणेश भक्तांच्या भावनेचा नगरपंचायत कडून खेळ करण्यात आला असून वडगाव नगरपंचायत कारभाराचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. सदरच्या गणरायाच्या मूर्त्या भक्तिभावनेने पुनवीसर्जित करण्यासाठी “जय मल्हार ग्रुप” सज्ज असून नगर पंचायत व पोलिस स्टेशन यांस “जय मल्हार ग्रुप”या सर्व मूर्त्या विसर्जन करण्याची परवानगी देण्यासाठी विनंती करतो. सरद घटनेचे फोटो व्हिडीओ पाहता नगरपचांयत व ठेकेदार याचा भोंगळ कारभारामुळे समाजातील नागरिकांच्या भावनाचा उद्रेक होऊ शकतो, तरी पोलीस स्टेशन यांनी दखल घ्यावी.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ न्यायालयासाठी मंजूर १०९ कोटी निधीतून भव्य इमारत उभारण्याचा निर्णय ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित बैठक संपन्न
– गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित