Dainik Maval News : वाहन उद्योगात ह्युंदाई कंपनीचे मोठे नाव आहे. कंपनीने राज्यातही गुंतवणूक केली आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील (तळेगाव दाभाडे) प्रकल्पातून वाहन उत्पादनात वाढ होणार आहे. ह्युंदाई कंपनीने राज्यात वाहन उद्योगात अधिकाधिक गुंतवणूक करीत रोजगार निर्मितीमध्ये वाढ करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी ह्युंदाई कंपनीच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत केले.
ह्युंदाई कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उन्सू किम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. बैठकीस मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, कंपनीचे कार्यकारी संचालक जिओन्जीक ली, उपाध्यक्ष (वित्त) सारावनन टी, सहायक उपाध्यक्ष पुनीत आनंद, कार्तिक एल, वरिष्ठ व्यवस्थापक विनोद बनसोड आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंपनी राज्यात सामाजिक उत्तरदायित्वअंतर्गत विविध कामांसाठी ५६ कोटी रुपयांचा निधी देत आहे. ही बाब स्तुत्य असून या निधीतून राज्यात सुरू असलेली कामे पथदर्शी ठरतील. या निधीतून कंपनीने पर्यावरण संवर्धनासाठी काम करीत रस्ता सुरक्षा, चालक प्रशिक्षण आदींमध्ये काम करावे. राज्यात उद्योगस्नेही वातावरण तयार करून उद्योगांना सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण करीत कंपनीच्या गुंतवणुकीसंदर्भातील माहिती दिली. पुणे येथील प्रकल्पाच्या कामाची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील वृक्षारोपण मोहीम, रस्ता सुरक्षा उपक्रम आदींचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मंत्री भेट देणार म्हणून एक दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका ; लोणावळा भेटीत परिवहन मंत्र्यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान । Lonavala News
– मावळच्या राजकारणातील सर्वात मोठे पक्षांतर ! काँग्रेस, राष्ट्रवादीसह अनेक पक्षांना खिंडार ; बापूसाहेब भेगडे यांच्या शेकडो समर्थकांचा भाजपात प्रवेश
– मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena