Dainik Maval News : येत्या काही महिन्यांत पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मावळ तालुक्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतल्याचे दिसत आहे. सात – आठ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मावळच्या राजकारणात न भुतो न भविष्यती असे बदल पाहायला मिळाले होते. वर्षानुवर्षे राष्ट्रवादीत राहिलेले अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून फारकत घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात उभे ठाकले होते. यानंतर आता सात – आठ महिन्यांनी पुन्हा एकदा मावळच्या राजकारणात मोठे बदल होताना दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या सोबत उभे राहत राष्ट्रवादीतील अनेक जुण्या जाणत्या नेत्यांनी पक्षविरोधी भुमिका घेतली होती. हे सर्वच प्रमुख नेते निवडणुकीनंतर भारतीय जनता पार्टी पक्षात जाणार अशी चर्चा होती. त्यानुसार पंधरा सप्टेंबर रोजी तालुक्यातील अनेक नेत्यांनी, ज्यात काही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील होते, काही काँग्रेसचे होते, तर काही अन्य पक्षातील होते यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच काही दिवसांत स्वतः बापू भेगडे हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. परंतु या सर्व घडामोडीत एक मोठी गोष्ट सर्वांच्या नजरेत भरली आहे, ती म्हणजे विधानसभेला बापू भेगडे यांच्या सोबत राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांनी घेतलेला यूटर्न.
अन्य नेत्यांसोबत बबनराव भेगडे हे देखील भाजपात जातील, अशी चर्चा होती. परंतु बबनराव भेगडे यांनी आता यूटर्न घेत आपल्याच पक्षात कायम आणि कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः बबनराव भेगडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ‘आपण अजित पवार यांच्यासोबतच’ असल्याचा निर्वाळा दिला आहे.
नक्की काय घडले?
शनिवार, दिनांक १३ सप्टेंबर रोजी अजित पवार यांनी बबनराव भेगडे आणि त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांना पुणे येथील पक्ष कार्यालयात बोलावून सविस्तर चर्चा केली. मागे झालेले मतभेद, समज गैरसमज दूर केले. आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची पक्ष बांधणीसाठी गरज आहे आणि आतापर्यंत दिलेले पक्षासाठी आपले योगदान महत्त्वाचे असून संघटनात्मक कामही केलेले आहे. त्यामुळे पक्षासाठी आपण आपले योगदान द्यावे, असे आवाहन अजित पवार यांनी केल्याचे बोलले जाते.
राष्ट्रवादीशी एकनिष्ठ बबनराव भेगडे :
बबनराव भेगडे सहकाराचे अभ्यासक आणि जाणकार असून त्यांनी आतापर्यंत तालुका आणि जिल्हास्तरावरील सहकार क्षेत्रात अनेक पदांवर काम केले आहे. समाजवादी काँग्रेस (एस काँग्रेस) तसेच शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते पक्षाचे सभासद आहेत. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे ते चार वेळा अध्यक्ष म्हणून राहिलेले आहे. त्यांनी पक्षात देखील विविध पदांवर काम करीत आहे. त्याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरदराव पवार आणि अजित पवार यांच्या विचारांशी ते एकनिष्ठ असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच ते आणि त्यांचे सहकारी समर्थक सक्रिय राहणार आहेत, अन्य कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे भेगडे यांनी सांगितले.
मी पक्ष सोडला नव्हता – भेगडे :
विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही गैरसमज पसरल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांमध्ये मतभेद झाले होते. त्यामुळे आपण पक्षाच्या कामापासून दूर होतो. मात्र पक्ष सोडला नव्हता. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असून त्याच पक्षात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी आणि माझे अनेक सहकारी समर्थक यांचाही हाच विचार असून आम्ही सर्वजण याबाबत पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्याशी भेटलो. आम्ही आपल्याबरोबरच आहोत अशी ग्वाही पुणे येथे झालेल्या प्रत्यक्ष भेटीत अजित दादांना दिलेली असून मी आणि माझे समर्थक कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.
एकूणच बबनराव भेगडे यांच्या या यूटर्नमुळे मावळच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. कारण बबनराव भेगडे यांच्या सोबत साधारण दोनशे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.
तसेच, भेगडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली, त्यावेळीही कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक घारे बबनराव भोंगाडे, उपसभापती नामदेव शेलार, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे, खादी ग्रामोद्योग संघाचे अध्यक्ष अंकुश आंबेकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुनील दाभाडे, माजी सरपंच ज्ञानेश्वर मराठे, चंद्रकांत दहिभाते, बाळासाहेब भदे, लहू सावळे, रवींद्र घारे, आयुब सिकिलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड साहेबराव टकले, शंकर वाजे,ॲड ज्ञानेश्वर दाभोळे, रघुनाथ मालपोटे, नगरसेवक अभिजीत काळोखे, प्रवीण काळोखे, जयेश मोरे, नवनाथ मालपोटे, विशाल मराठे, तानाजी दाभाडे, विठ्ठल जाधव, शरद भोंगाडे,राहुल पारगे, माजी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रूपाली दाभाडे यांच्यासह महिला पदाधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया.
