Dainik Maval News : मावळ तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय सोमवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता लिहिला जाणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते शिवशंभू तीर्थ मैदान, तळेगाव येथे संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एकूण ७६१ कोटी १७ लाख रुपयांच्या लोकार्पण व भूमिपूजनाच्या कामांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
या कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री मदन बाफना, संजय भेगडे, माजी आमदार रुपलेखा ढोरे, तसेच संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक माऊली दाभाडे, बापूसाहेब भेगडे, पुणे पीपल्स बँकेचे संचालक बबनराव भेगडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी नगराध्यक्ष अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, यादवेंद्र खळदे आणि श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तळेगाव नगरपरिषदेची ही नवी वास्तू आधुनिक सुविधांनी सज्ज असून, एकूण खर्च ४० कोटी रुपये इतका आहे. या इमारतीत सिव्हिल वर्कसाठी २७ कोटी, फर्निचरसाठी ८ कोटी आणि विद्युत कामांसाठी ५ कोटी खर्च करण्यात आला आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे अभियंता राम सरगर यांनी दिली. चार मजल्यांच्या या वास्तूमध्ये पहिल्या मजल्यावर कर, पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत आणि अग्निशमन विभागांचे कार्यालय असणार आहे. दुसऱ्या मजल्यावर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष कक्ष आणि कॉन्फरन्स हॉल, तर तिसऱ्या मजल्यावर बांधकाम, नगररचना, लेखा आणि मुख्याधिकारी कक्ष असेल. चौथ्या मजल्यावर संगणक विभाग, शिक्षण विभाग, पंचकोनी डुप्लेक्स सभागृह आणि पत्रकार बाल्कनीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.
या सोहळ्यात ७७ कोटी ५४ लाख रुपयांच्या लोकार्पण कामांसह ६८३ कोटी ६३ लाख रुपयांच्या भूमिपूजन कामांचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये तळेगाव नगरपरिषद प्रशासकीय इमारत (४० कोटी), श्री शिवशंभू स्मारक तीर्थ (१ कोटी ७१ लाख), लोणावळा शहरी व ग्रामीण पोलीस स्टेशन (एकूण १० कोटी ९३ लाख), गहुंजे-साळुंब्रे पूल (१४ कोटी १५ लाख) आणि वडेश्वर आदिवासी आश्रमशाळा (१० कोटी ७५ लाख) यांचा समावेश आहे.
तसेच भूमिपूजन होणाऱ्या महत्त्वाच्या कामांमध्ये कुरवंडे लायन्स व टायगर पॉइंट रस्ता (१८४ कोटी), देहू-येलवाडी रस्ता कॉक्रीटीकरण (१२५ कोटी), चाणक्य एक्सलन्स सेंटर कार्ला (४२ कोटी ७० लाख), वडगाव पाणीपुरवठा योजना (४० कोटी), तिकोना-तुंग-राजमाची किल्ले रस्ते (३८ कोटी), तसेच जिल्हा वार्षिक योजना व PMRDA अंतर्गत विविध रस्त्यांच्या कॉक्रीटीकरणाच्या कामांचा समावेश आहे.
या लोकार्पण सोहळ्यामुळे मावळ तालुक्याच्या विकासयात्रेला नवसंजीवनी मिळणार असून, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची ही वास्तू भविष्यातील जनसेवेचे केंद्र ठरणार आहे. आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नातून आकारास आलेल्या या भव्य वास्तूचा आणि विकास प्रकल्पांचा हा सोहळा मावळकरांसाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागविले इच्छुक उमेदवारांचे अर्ज
– ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाचा तिसरा टप्पा ३ नोव्हेंबरपासून – वाचा सविस्तर
– जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली, पोलीस अधीक्षकांच्या सुचनाही नजरेआड ; लोणावळा शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच