Dainik Maval News : दिनांक 2 डिसेंबर रोजी मतदान झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निकाल 21 डिसेंबर रोजी लागणार आहे. तसेच उर्वरित ज्या जागा आहेत, ज्यांची निवडणूक स्थगित करण्यात आली होती त्यांच्यासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 21 तारखेला त्यांचाही निकाल लागणार आहे. 21 डिसेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर थेट जनतेतून निवडून येणारे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या एकूण निकालाचे चित्र स्पष्ट होईल. मात्र या निकालानंतर उपनगराध्यक्ष कोण होणार, यासाठी आतापासूनच निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून आणि बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांकडून फिल्डिंग लावली जात आहे.
मावळ तालुक्यात वडगाव नगरपंचायत आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद या तीन ठिकाणच्या निवडणुका होत आहे. यातील वडगाव नगरपंचायत ठिकाणी थेट जनतेतून निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष पदासाठी चार उमेदवार रिंगणात आहेत. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर लोणावळ्यामध्ये 7 उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
लोणावळा, तळेगाव आणि वडगाव या तिन्ही ठिकाणच्या नगराध्यक्ष पदाचा फैसला, जनता करणार असून जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाईल. मात्र यानंतर तीनही ठिकाणी ज्या पक्षाची सत्ता येईल, किंवा ज्या गटाचे बलाबल अधिक असेल तो सत्ते येईल आणि सत्तेत येणाऱ्या नगरसेवकांपैकी बहुमताने उपनगराध्यक्ष निवडला जाणार आहे. नगराध्यक्ष पदाखालोखाल उपनगराध्यक्ष पद देखील तितकेच प्रतिष्ठेचे असल्याने या पदासाठी आतापासूनच सेटिंग लावली जात आहे.
तळेगाव दाभाडे –
तळेगावमध्ये महायुतीचे विजयी नगरसेवक सर्वाधिक असणार, हे सर्वश्रूत असल्याने आणि यातील भारतीय जनता पार्टी पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला उपनगराध्यक्ष पद मिळेल, अशी चिन्हे आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या बिनविरोध नगरसेवक आणि निवडून येणाऱ्या नगरसेवक यांच्याकडून उपनगराध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावली जात आहे.
लोणावळा –
लोणावळ्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबतच शिवसेना व अन्य पक्ष पक्ष ज्या पक्षाचे सर्वाधिक संख्याबळ असेल किंवा ज्यांची युती किंवा आघाडीची सत्ता येईल, त्यांच्या गटाला बहुमताने उपनगराध्यक्ष करण्याची संधी असणार आहे. त्यामुळे तिथेही त्या पद्धतीमध्ये इच्छुकांकडून फिल्डिंग लावली जात आहे.
वडगाव –
वडगावमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक येतात की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे अधिक नगरसेवक येतात, यावर गणित अवलंबून आहे. मात्र दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या इच्छुकांकडून किंवा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांकडून उपनगराध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी केली जात आहे. खरंतर 21 डिसेंबर रोजी निकाल लागल्यानंतर तीनही ठिकाणचे चित्र स्पष्ट होईल आणि कुठल्या पक्षाची, युतीची, आघाडीची सत्ता येईल त्यावर उपनगराध्यक्ष पद कोण होऊ शकेल किंवा कुठल्या गटाचा होऊ शकेल हे निश्चित होईल.
मात्र संभाव्य विजय गृहीत धरून आतापासूनच इच्छुक तयारीला लागले आहेत आणि त्यांच्याकडून पक्षाच्या वरिष्ठांकडे खेटे घालणे चालू झालेले आहेत. तसेच दोन डिसेंबरला मतदान झाल्यानंतर निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार देवदर्शनाला गेले असून काही उमेदवार देवदर्शन करूनही पुन्हा परतले आहेत. अशा सर्वांच्या दररोज बैठका होत असून आकडेमोड, सर्वे या आधारावर विजय – पराजय याचे गणित मांडले जात आहे. या गणितांमध्ये उपनगराध्यक्ष पद आणि इतर जबाबदाऱ्यांबाबतही जोरदार चर्चा होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मध्य रेल्वेकडून लोणावळा स्थानकाजवळ तीन दिवस ब्लॉक ; पुणे-मुंबई रेल्वे सेवा होणार विस्कळीत, रेल्वे प्रवाशांना आवाहन…
– विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या निवडणुका पैशांच्या मुद्द्यावर संपल्या ; मावळात नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीत पैशांचा पाऊस
– राज्यातील सर्व नगरपंचायत, नगरपरिषदांची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार ; नागपूर खंडपीठाचा आदेश, वाचा सविस्तर
– तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट ! सहा जागांवरील निवडणूक स्थगित, ‘हे’ आहे कारण
