Dainik Maval News : पुणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रिंग रोड सह विविध रस्ते व मेट्रो प्रकल्पाची कामे सुरु आहेत. रिंगरोडच्या पूर्व भागाचे काम मे 2028 पर्यंत आणि पश्चिमेकडील भागाचे काम मे 2026 पर्यंत पूर्ण होईल. तसेच हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरच्या कामाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
सदस्य राहुल कुल यांनी पुणे रिंग रोड व इतर प्रकल्पासंदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. या चर्चेत सदस्य सुनील शेळके, अभिजित पाटील यांनी सहभाग घेतला.
मंत्री भुसे म्हणाले की, पुण्याच्या ग्रामीण भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएसआरडीसी व एमएसआयडीसीमार्फत रिंग रोड, इतर रस्ते विकसित करणे आणि हडपसर-लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉर या प्रमुख प्रकल्पांवर काम सुरु आहेत.
पुणे रिंग रोडला गती; पूर्व-पश्चिम टप्प्यांतील कामे प्रगतीपथावर
पुणे रिंग रोडसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांना वेग देण्यासाठी प्रशासनाने निर्णायक पावले उचलली आहेत. रिंग रोड पूर्वमधील 12 पैकी नऊ पॅकेजेसची कामे वेगाने सुरू असून उर्वरित तीन पॅकेजेस प्रशासकीय मान्यतेसाठी प्रक्रियेत आहेत. ही तिन्ही पॅकेजेस मे 2026 पूर्वी निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच ऑक्टोबर 2026 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
रिंग रोड पश्चिममधील सर्व पाच पॅकेजेसची कामे प्रगतीपथावर असून प्रकल्पाची पूर्णता मुदत पश्चिमेस मे 2027 तर पूर्वेस मे 2028 अशी निश्चित करण्यात आली आहे, असे मंत्री भुसे यांनी सांगितले.
रस्ते प्रकल्पांना वेग
पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांच्या उन्नतीसाठी एमएसआयडीसीकडून जलद कामकाज सुरू आहे. हडपसर–यवत मार्ग प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. पुणे–शिरूर या सहा पदरी रस्त्याला मंत्रिमंडळने मान्यता दिली असून निविदा स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. शिरूर–छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड प्रकल्पाचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती मंत्री भुसे यांनी यावेळी दिली.
हडपसर–लोणी काळभोर मेट्रो कॅरिडॉरला गती
महामेट्रोकडून 11.8 कि.मी. लांबीच्या मेट्रोला मंजुरी दिली असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. फ्लायओवर क्रॉसिंगसारख्या तांत्रिक अडचणींसाठी अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्याचे निर्देश दिले असून फिजिबिलिटी तपासणीनंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
या कामांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवत प्रकल्पांच्या परवानग्या, भूसंपादन आणि कामांची गती यावर नियतकालिक आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. सोलापूर- पुणे रस्त्या संदर्भात बैठक झाली असून हे काम करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– लोणावळा नगरपरिषद निवडणूक 2025 : शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची अखेरच्या दिवशी माघार
– लाडकी बहीण योजनेबाबत महत्वाची अपडेट ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा
– इंडिगो एअरलाईन्सच्या सेवा खंडीत होण्याचा मावळातील फूल उत्पादकांना फटका ; कोट्यवधीचे नुकसान
– नगराध्यक्षाचं जनता ठरवेल, पण उपनगराध्यक्षाचं बोला ! उमेदवारांकडून उपनगराध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावायला सुरूवात
