Dainik Maval News : पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे. लोणावळा रेल्वे स्थानकावर करण्यात आलेल्या यार्ड रिमॉडेलिंग आणि रिसेप्शन अँड डिस्पॅच (R&D) लाइनच्या विस्तारीकरणामुळे आता प्रवासी रेल गाड्यांना मालगाड्यांसाठी थांबावे लागणार नाही. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई रेल्वे विभागाने लोणावळा स्थानकात मोठे तांत्रिक बदल करीत लोहमार्गाची लांबी सुमारे १५० मीटरने वाढवली आहे. पूर्वी ७०० मीटर असलेली मार्गिका आता ८५० मीटरहून अधिक लांब करण्यात आली असून, त्यासोबत दोन नवीन लूप लाईनही कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लांब मालगाड्या आणि ‘बँकर’सह धावणाऱ्या गाड्या सहजपणे बाजूच्या मार्गिकांवर घेणे शक्य झाले आहे.
याआधी पुणे–मुंबई मार्गावर लोणावळा परिसरात मालगाड्यांमुळे प्रवासी गाड्यांना १५ ते २० मिनिटे थांबावे लागत होते. आता स्वतंत्र लूप लाईन उपलब्ध झाल्याने मालगाड्या मुख्य मार्गावर न येता बाजूच्या मार्गिकांवर थांबवता येणार आहेत. परिणामी, प्रवासी गाड्यांचा प्रवास अधिक सुरळीत होणार आहे.
विशेष म्हणजे, बँकर इंजिन जोडणे व काढण्यासाठी लागणारा १० ते १५ मिनिटांचा वेळही आता वाचणार आहे. मालगाड्यांसाठी स्वतंत्र लाईन असल्याने बँकर जोडण्याची प्रक्रिया मुख्य मार्गापासून वेगळी होणार आहे. त्यामुळे मेन लाईन प्रवासी गाड्यांसाठी मोकळी राहणार आहे.
यार्डमधील ‘अप’ आणि ‘डाउन’ दोन्ही बाजूंच्या आरएनडी लाईन्सची लांबी वाढवण्यात आल्यामुळे एकाच वेळी अनेक गाड्यांचे क्रॉसिंग, ओव्हरटेकिंग आणि प्रस्थान अधिक जलद होणार आहे. तांत्रिक अडचणी किंवा अचानक उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय करण्यासाठीही आता अधिक वेळ उपलब्ध होणार आहे.
दररोज लोणावळा स्थानकातून सुमारे १५ मालगाड्या, ३७ प्रवासी गाड्या आणि ४१ लोकल फेऱ्या होतात. एक लाखाहून अधिक प्रवासी या मार्गावर प्रवास करतात. यार्ड रिमॉडेलिंगमुळे या सर्व वाहतुकीवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी सांगितले की, लोणावळा स्थानकावरील यार्ड रिमॉडेलिंग आणि आरएनडी लाईनच्या विस्तारीकरणामुळे स्थानकाची कार्यक्षमता वाढली असून, प्रवासी गाड्यांना आता अनावश्यक थांबा टाळता येणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

