Dainik Maval News : मावळ तालुक्यातील बधलवाडी याठिकाणी हनुमान मंदिराचे पुनर्निर्माण करतेवेळी पाया घेताना जमिनीच्या 7 – 8 फूट खाली जुनी मारुती मूर्ती समोर आली. याची माहिती सर्वप्रथम स्थानिक मंडळातील रवी कडलक, सोपान दहातोंडे व सचिन रौधळ यांनी इतिहास अभ्यासक प्रमोद बोऱ्हाडे यांना दिली तसेच संशोधनाकरिता मौलिक सहकार्य केले.
मावळ तालुक्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. प्राचीन कालखंड, मध्ययुग ते अर्वाचिन काळापर्यंत अनेक बारवा, समाधी, शिलालेख, लेणी, दुर्ग व मंदिरे मोठ्या प्रमाणावर येथे निर्माण झाल्याचे दिसून येते. मावळातील नवलाखउंब्रे गाव हे शिवकालीन इतिहासाचे बोलके साक्षीदार आहे. ऐतिहासिक भैरवनाथ मंदिर, भव्य नगारखाना, आंग्लकालीन राम मंदिर, शिवकालीन पायऱ्यांची विहीर – तळे, खापरी नळाच्या योजना, तेलाचे घाणे, समाधी, रंगशीला, दिपमाळा व बाजारपेठ अशा नानाविध ऐतिहासिक वारशाने नवलाखउंब्रे हे गाव समृद्ध आहे. शिवकालीन बाजारपेठेचे गाव म्हणून मान्यता पावलेल्या या गावाशेजारी अनेक वाड्या-वस्त्या कालौघात वसल्या. त्यातील एक बधलवाडी होय.
जमिनीखाली आढळलेल्या मूर्तिविषयी…
या मूर्तीला चपेटदान मुद्रा असे संबोधले जाते. सदर मूर्ती भग्न वा खंडित नाही. जमिनीखाली किमान 100 वर्षे राहिल्याने फारशी झीज झालेली नाही. अखंड शिळेवर कोरलेली ही मूर्ती अडीच फूट उंच असून मिशिधारी दर्शविलेली आहे. दोन्ही हातात कडे व बाजूबंद, गळ्यात कंठा, दोन्ही पायात तोडे व कमरेला सोवळे सदृश्य शेला आहे. शक्ती-सामर्थ्य व विजयाचे प्रतीक म्हणून पायाखाली पनवती दर्शविली आहे. महत्वाच्या कामास जाताना मारुतीस जाण्याचं कारण हे की मागची पनवती निघून जावी अशी समाज धारणा आजपर्यंत टिकून आहे. ही मूर्ती साधारण पाऊणे दोनशे वर्षे जुनी असल्याचे प्राथमिक संशोधनातून समोर आले आहे. 1850 च्या दरम्यान याची निर्मिती संभवते. याबाबत मूर्तीशास्र विषयातील जेष्ठ इतिहासकारांची मते देखील तपासण्यात आली आहेत. मूर्तिच्या गुणवैशिष्ठ्यात सुबकता, देखणेपणा विशेष जाणवतो.
कसबे नवलाख उंब्रे हे प्रांत जुन्नर सुभा पुणे अंतर्गत मध्ययुगात मोठ्या नावारूपाला आलेला कसबा होते. येथील मूळ पाटीलकी पापळ यांसकडे होती. पुढील काळात निमी पाटीलकी यशवंतराव दाभाडे सेनापती यांनी खरेदी घेतली होती. पापळ पाटील यांचा प्रथम लिखित शिलालेखातील उल्लेख 1760 – 61 साली कर्वे – उपाध्ये निर्मित करंजगाव – ब्राम्हणवाडी येथील बारव यावर आढळला. याठिकाणी राम मंदिराकरिता पेशवे सरकारातून जमीन इनाम दिली असल्याचे पुरावे आहेत. राम मंदिराच्या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. नवलाखउंब्रे गावास ऐतिहासिक वारसा मोठ्या प्रमाणात लाभला असून नव्याने येथील अनेक आडनावे, जुनी घराणी व वास्तू समोर येत आहेत. त्यातीलच ही आढळलेली हनुमान मूर्ती होय. नवलाख उंब्रे भागातील कोणाकडे जर मोडी लिपितील कागदपत्रे असतील तर त्यांनी वाचणासाठी माझ्याकडे द्यावीत. यामुळे त्या भागाच्या इतिहासात भर पडेल. -डॉ. प्रमोद बोराडे, इतिहास संशोधक
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

