Dainik Maval News : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अबोली ढोरे या १४६० मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या अॅड. मृणाल म्हाळसकर यांचा पराभव केला. परंतु याच निवडणुकीत नवनिर्वाचित नगराध्यक्षा अबोली ढोरे यांचे पती आणि वडगावचे पहिले नगराध्यक्ष राहिलेले मयूर ढोरे यांचा नगरसेवकपदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे.
वडगाव नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने १७ पैकी नऊ जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व निर्माण केले. भाजपला सहा जागा मिळाल्या असून दोन अपक्षांनी बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदासाठी अबोली ढोरे यांना ७ हजार ७९५, मृणाल म्हाळसकर यांना ६ हजार ३३५ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या वैशाली उदागे यांना केवळ २५८ मते मिळाली.
वडगावचे पहिले नगराध्यक्ष मयूर ढोरे हे प्रभाग क्रमांक सहा मधून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत होते. त्यांचा भाजपाचे विशाल वहिले यांनी ७४ मतांनी पराभव केला. ढोरे यांना ३९९, वहिले यांना ४७३ मते मिळाली.
कुठे एक कर कुठे दोन मतांनी विजय
प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता ढोरे या केवळ एक मताने निवडून आल्या. प्रभाग क्रमांक सातमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय भवार हे केवळ दोन मतांनी निवडून आले आहेत.
वडगाव नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिली सार्वत्रिक निवडणूक सन २०१८ मध्ये झाली होती. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी वडगाव-कातवी नगरविकास समितीचे मयूर ढोरे निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सात नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर आता आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळविला आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime
