Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षासह तीन स्वीकृत नगरसेवकांची निवड मंगळवारी (दि. १३) होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. मंगळवारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवीन निर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची पहिली सभा होणार असून या सभेत नियमानुसार उपनगराध्यक्ष आणि तीन स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत एकूण २८ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ तर भाजपचे १० सदस्य आहेत. उर्वरित एक सदस्य अपक्ष आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांनी युती म्हणून निवडणूक लढवली होती.
महायुतीतील ठरलेल्या सामंजस्यानुसार पहिल्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपदाची संधी भाजपाचे संतोष दाभाडे यांना देण्यात आली असून उर्वरित अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश काकडे यांना नगराध्यक्षपद देण्यात येणार आहे. त्यानुसार सध्याच्या प्रथम टप्प्यावर उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
स्वीकृत सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, तर भाजपचा एक सदस्य निवडला जाणार आहे. दोन्ही पक्षांचे स्वतंत्र गट स्थापन झाले असून संख्याबळानुसार ही निवड होणार आहे. या निवडणुकीबरोबरच याच सभेत गटनेते तसेच विरोधी पक्षनेत्यांची निवडही करण्यात येणार आहे.
दरम्यान, उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य पदांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून अनेक नगरसेवकांनी पहिली संधी मिळावी, यासाठी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पदांची मुदत प्रत्येकी सहा महिन्यांची असणार असल्याचे समजते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा समिती सभापतीपदी सुनील ढोरे ; आमदार सुनील शेळके यांच्याकडून घोषणा
– काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे निधन ; भारतीय हवाई दलात पायलट ते केंद्रीय मंत्री, अशी होती कलमाडी यांची कारकीर्द
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे २३ जानेवारीपासून भव्य गाथा व ज्ञानेश्वरी पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे आयोजन ; कार्यक्रमाची जोरदार तयारी
