Dainik Maval News : मावळचे आमदार सुनील शेळके, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मोरया प्रतिष्ठानच्या विशेष सहकार्याने वडगाव – कातवी शहरामधील ठाकर समाजातील सुमारे १३ कुटुंबीयांना वडगाव नगरपंचायतीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अबोली मयूर ढोरे यांच्या हस्ते जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले. नगराध्यक्ष सौ. ढोरे यांच्या कक्षात दाखले वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अजय भवार, गौतम सोनवणे उपस्थित होते.
आदिवासी समाजातील कुटुंबीयांचा कागदपत्रांअभावी होणारा त्रास कमी करण्यासाठी शासकीय स्तरावर आमदार सुनील शेळके जनसंपर्क कार्यालयाच्या सहकार्यातून तसेच मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून या समाजातील बांधवांना विविध दाखले मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमातून या कुटुंबीयांना आज प्रत्यक्षात जातीचे दाखले उपलब्ध झाले असून खूप वर्षांचा प्रश्न मार्गी लागल्याने कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.
याव्यतिरिक्त अजूनही ठाकर समाजातील काही कुटुंबीयांना जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे, असे नगराध्यक्षा अबोली ढोरे यांनी सांगितले. तसेच, दाखले मिळाल्यानंतर आदिवासी कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत आमदार सुनील शेळके, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि नगराध्यक्षा अबोली ढोरे यांचे विशेष आभार मानले.
वडगाव शहरातील ठाकर, आदिवासी, कातकरी समाजातील अनेक बांधव जातीच्या दाखल्यापासून वंचित असल्याने शैक्षणिक कामांसाठी तसेच इतर शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी जात प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. परंतु ज्यांचे पूर्वज शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते तसेच भूमिहीन होते अशा कुटुंबातील नागरिकांना तसेच त्यांच्या पाल्यांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी नाहक मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि वेळोवेळी दाखला काढण्यासाठी लागणा-या कागदपत्रांची जुळवाजुळव करताना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असतात. या समाजातील कुटुंबीयांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयातील रुपेश सोनुने यांचे विशेष सहकार्य मिळाले.
येणाऱ्या कालावधीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध हितकारक योजना तसेच महिला समाज कल्याण विभाग वडगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून महिला भगिनींसाठी बचत गट स्थापन करणे यांसह अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी नियोजन केले जाईल, अशी माहिती नगराध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– जागा काही मिळेना अन् कचऱ्याची समस्या काही सुटेना ! टाकवे बुद्रुक ग्रामस्थ कचऱ्याच्या समस्येने हैराण
– येलघोल-धनगव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते उद्घाटन
– …तर भाजपालाही उपनगराध्यक्षपद देईन ; वडगाव नगरपंचायतीत भाजपाचा उपनगराध्यक्ष करण्याबाबत आमदार सुनील शेळके सकारात्मक

