Dainik Maval News : मंगळवार (दिनांक 13 जानेवारी) रोजी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर निवडणुका जाहीर झालेल्या ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून पंचायत समिती मावळची देखील निवडणूक जाहीर झालेली आहे. या अनुषंगाने मावळात देखील राजकीय घडामोडी वेगाने घडत असून राजकीय पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू झालेले आहे.
मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण पाच गट आहेत, तर पंचायत समितीचे एकूण दहा गण आहेत. आजपर्यंत वेगवेगळ्या वेळी, ठिकाणी मावळ तालुक्यातील काही राजकीय पक्षांकडून आपल्या पक्षांच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानुसार आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने तीन उमेदवार जाहीर केले होते, तर भारतीय जनता पार्टी पक्षाने दोन आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) व शिवसेना उबाठा यांच्याकडून प्रत्येकी एक असे सात उमेदवार जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर आज, बुधवार (दिनांक 14 जानेवारी) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून आणखीन दोन उमेदवार अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेले आहे.
यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाने चांदखेड पंचायत समिती गणातून सुनिता मनोज येवले, टाकवे बुद्रुक पंचायत समिती गणातून प्राची देवाभाऊ गायकवाड आणि खडकाळा-कार्ला जिल्हा परिषद गटातून दिपाली दीपक हुलावळे यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोमाटणे पंचायत समिती गण आणि सोमाटणे जिल्हा परिषद गट मधील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
सोमाटणे पंचायत समितीचा गण नागरिकांचा मागास प्रवर्ग याकरिता आरक्षित असून येथून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे नेते साहेबराव कारके यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तर सोमाटणे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित असून या जिल्हा परिषद गटातून मनीषा नितीन मुऱ्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी याबाबत माहिती दिली असून राष्ट्रवादीचे आतापर्यंत पाच उमेदवार जाहीर झालेले दिसून येतात. यापैकी चांदखेड सोमाटणे जिल्हा परिषद गट यातील जिल्हा परिषदेचा उमेदवार आणि पंचायत समितीच्या दोन्ही गणातील उमेदवार जाहीर झाले असून लवकरच पक्षाकडून उर्वरित जिल्हा परिषद गटातील आणि गणातील उमेदवार जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा