Dainik Maval News : महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित अनंतराव पवार यांचे आज ( बुधवार, दि. २८ जानेवारी ) रोजी सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झाले. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातानंतर त्यांचे पार्थिव बारामती मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले होते. आता हे पार्थिव विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात ठेवण्यात येणार आहे. तसेच उद्या सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अजित पवारांचे पार्थिव आज सायंकाळी ४ वाजल्यापासून बारामती येथील विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनाकरता रात्री उशिरापर्यंत नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहे. तर, उद्या सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा निघेल. गदिमा चौक, विद्यानगरी चौक, विद्याप्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता (मराठी शाळेच्या गेटने) विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जाईल.
उद्या सकाळी ११ वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याकरता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात येणार आहेत.
राज्यात शासकीय दुखवटा जाहीर
महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग (राजशिष्टाचार) विभागामार्फत कळविण्यात आले आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– महाराष्ट्राच्या राजकारणाला असलेला शाप ! दादा – आबा – साहेब … अनेक दिग्गजांनी घेतलीये अकाली एक्झिट
– मावळची विकासरेखा हरवली ! मावळ विधानसभेच्या माजी आमदार रुपलेखा ढोरे यांचे अल्प आजाराने निधन
