Dainik Maval News : मावळ तालुक्यातील दरडप्रवण आणि अतिधोकादायक गावांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आता थेट मंत्रालयाच्या पातळीवर पोहोचला आहे. पाटण येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच तालुक्यातील इतर धोकादायक गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत बुधवार, १२ ऑगस्ट रोजी मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा जाधव (पाटील) यांच्या दालनात आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मावळमधील नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने मांडण्यात आला असून, पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
पाटण गावातील बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बैठकीत प्राधान्याने चर्चेला आला. नागरिकांच्या रास्त मागण्या प्रशासनासमोर मांडल्यानंतर पाटण गावातील बाधित नागरिकांचे गावातीलच गट क्रमांक ४०६ मधील गायरान जागेत पुनर्वसन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दुर्घटनेनंतर असुरक्षित परिस्थितीत असलेल्या पाटण ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा मार्ग निश्चित झाला आहे.
यासोबतच माळीणसदृश आणि अतिधोकादायक परिस्थिती असलेल्या कळकराई (सावळा), बोरज, भुशी, माऊ, तुंग, मालेवाडी (महागाव), ताजे आणि लोहगड या गावांचे पुढील दहा दिवसांत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागामार्फत (GSI) प्राधान्याने सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील) यांनी दिले. या सर्वेक्षणातून संबंधित गावांमधील दरड व भूस्खलनाचा धोका, भूगर्भीय परिस्थिती आणि पुनर्वसनाची आवश्यकता याबाबत स्पष्टता मिळणार आहे.
मावळच्या डोंगराळ भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ पावसाळ्यापुरता मर्यादित नसून, भविष्यातील जीवितहानी टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी बैठकीत धोकादायक गावांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी पुनर्वसनाची कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यावर शासनस्तरावर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
या सर्व गावांच्या पुनर्वसनासाठी लागणारा अपेक्षित खर्च तसेच रस्ते, पाणी, वीज आणि इतर आवश्यक नागरी सुविधांचा समावेश असलेला परिपूर्ण प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोरही ठेवण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. ज्या गावांना किंवा भागांना पूर्ण पुनर्वसनाची आवश्यकता नाही, अशा ठिकाणी भूस्खलन रोखण्यासाठी संरक्षक भिंती आणि इतर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
पाटण दुर्घटनेनंतर मावळातील दरडप्रवण गावांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेता, या बैठकीतील निर्णय अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. विशेषतः पाटणच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित होणे आणि इतर आठ अतिधोकादायक गावांचे दहा दिवसांत GSI सर्वेक्षण करण्याचे आदेश मिळणे, यामुळे मावळातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनस्तरावर ठोस पावले उचलली जात असल्याचे चित्र आहे.
“मावळमधील एकाही नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात,” अशी भूमिका आमदार सुनील शेळके यांनी बैठकीत मांडली. आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर पुढील काळातही सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस पुनर्वसन विभागाचे सहसचिव संजय इंगळे, अवर सचिव बाळासाहेब हजारे, पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, मावळ-मुळशीचे उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
– टाकवे बुद्रुक जवळील इंद्रायणी नदी पुलावर खड्डे ; खड्ड्यातून लोखंडी सळई बाहेर; दुचाकीसह चारचाकी वाहनांना अपघाताचा धोका
– शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू
– महत्वाची बातमी ! पाथरगाव येथील इंद्रायणी नदीवरील जुना दगडी पूल सुरक्षिततेच्यादृष्टीने वाहतुकीसाठी बंद
