Dainik Maval News : मावळ तालुक्यात पाटण गावामध्ये सोमवारी (दि.६) पहाटे मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची दुर्घटना घडली. मुसळधार आणि संततधार पावसामुळे एका घरावर ही दरड कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन सदस्य दगड-माती आणि चिखलाच्या दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्दैवी दुर्घटनेत तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवून तिघांचेही मृतदेह बाहेर काढले असून, शोधकार्य पूर्ण झाले आहे. या घटनेत मुलगा ज्ञानेश्वर नंदू तिकोणे, वडील नंदू दत्तू तिकोणे आणि आई अनिता नंदू तिकोणे यांचा मृत्यू झाला आहे.
वर्षभरापूर्वीच झालं होतं लग्न :
ज्ञानेश्वर तिकोणे याचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्याची पत्नी गरोदर असल्याने ज्ञानेश्वर आणि कुटुंबीयांनी तिला मळवली येथील नातेवाईकाच्या घरी ठेवले होते. यामुळे तिचा जीव वाचला. परंतु झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पाटण गावातील दरड दुर्घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे, तहसीलदार, प्रांताधिकारी, शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथक, ग्रामस्थ, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकाने मदतकार्य सुरू केले. दुपारी एकपर्यंत तिन्ही मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले. मावळचे आमदार सुनील शेळके, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
डोंगरकडांवरील गावांचे सर्वेक्षण सुरू
दुर्घटनाग्रस्त पाटण गावातील अन्य संवेदनशील घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच, डोंगरकडांच्या परिसरातील इतर गावांचेही सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे,” अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
– पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू
– पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
