Dainik Maval News : मावळ तालुक्यात दि. ५ व ६ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भूस्खलन, पूरसदृश्य परिस्थिती, रस्ते बंद होणे, घरांची पडझड, घरांमध्ये पावसाचे पाणी शिरणे, पशुधन व पिकांचे नुकसान तसेच नागरिक व पर्यटक अडकण्याच्या घटना घडल्या. या आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर बचाव व मदतकार्य राबवून विविध ठिकाणी अडकलेल्या एक हजार १३७ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर केले. दुर्दैवाने पाच नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसांना शासन निर्णयानुसार अनुज्ञेय आर्थिक मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी उपस्थित राहून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पीएमआरडीए, लोणावळा व वडगाव नगरपरिषद, पोलीस, आपदा मित्र, वन्यजीव रेस्क्यू टीम, शिवदुर्ग टीम, स्थानिक ग्रामस्थ तसेच विविध प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयातून प्रभावी बचाव व मदतकार्य केले.
भूस्खलनामुळे बाधित क्षेत्र
मावळ तालुक्यातील मौजे पाटण येथे दि. ६ जुलै रोजी झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला असून एक घर पूर्णपणे नष्ट झाले. मौजे खंडाळा येथील रस्टिक हायलँड सोसायटीमधील नॉर्थ पॉईंट हॉटेलमध्ये अडकलेल्या १४ पर्यटक व नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. या परिसरातील आठ ते दहा बंगल्यांमध्ये माती व दगडांचा मोठ्या प्रमाणात मलबा शिरला असून येथे एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
मौजे ताजे येथे सतर्कतेचा इशारा देऊन ५६ कुटुंबांतील ३०५ नागरिकांना जिल्हा परिषद शाळा व सज्जनवाडी येथील अंगणवाडीत उभारलेल्या निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले. मौजे भाजे येथील संपर्क शाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनाही तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित निवारा केंद्रात हलविण्यात आले.
दुधीवरे खिंड, तुंग-जवन रस्ता, आपटी, डाहुली, बऊर खिंड, चावसर घाट, कोळे-चाफेसर रस्ता तसेच तुंगार्ली-पांगळोली मार्गावर भूस्खलनामुळे माती व दगडांचा मलबा आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. बलयन येथील स्मशानभूमीही मलब्याखाली गेली.
पुरसदृश्य परिस्थितीत अडकलेल्या एक हजार १३७ नागरिकांचे स्थलांतर
मौजे निगडे येथील गार ओढ्यात एक नागरिक वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. भांगरवाडी (लोणावळा) येथील हुडको सोसायटीतील सुमारे ५१० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून नगरपरिषदेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले. मळवली येथील समर कॅसल परिसर, डेल्टीन एस्केप व्हिला, इशांत फार्म व इतर बंगल्यांमध्ये अडकलेल्या ९७ पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
पवनानगर बाजारपेठ, कामशेत, वळवण येथील डेनकर कॉलनी व कालेकर वस्ती, साळुंब्रे येथील नदीकाठची घरे, डोंगरगाव येथील वेताळनगर झोपडपट्टी तसेच सांगवडे, गहुंजे व लोढा सोसायटी परिसरात घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. डोंगरगाव व वळवण येथील ५०, साळुंब्रे येथील ३५, सांगवडे येथील २०, गहुंजे येथील ४०, ताजे येथील ३०५, भाजे येथील ३० आणि मळवली येथील ९७ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.
नुकसान पंचनाम्याची कार्यवाही सुरू
अतिवृष्टीमुळे सोमाटणे, कुसवली व करंडोली येथे घरांची पडझड झाली असून भात रोपे व भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक नुकसानीचे पंचनामे सुरू असून सार्वजनिक मालमत्ता, रस्ते, शेती व इतर मालमत्तेच्या नुकसानीचेही सर्वेक्षण करून शासन नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक
