टाकवे बुद्रुक, दि. १४ (प्रतिनिधी) – आंध्रा धरणामुळे बाधित झालेल्या १६ गावांतील ५४० कुटुंबांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावून धरणग्रस्तांचे योग्य पुनर्वसन करावे. तसेच तळेगाव नगरपरिषद व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेसाठी प्रस्तावित बंदिस्त जलवाहिनीची योजना कायमस्वरूपी स्थगित करावी, अशी ठाम मागणी आंदर मावळमधील धरणग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
धरणग्रस्तांचे वाढीव मोबदला, पुनर्वसन, धरणग्रस्त दाखले, रोजगार आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. हे सर्व प्रश्न पूर्णपणे मार्गी लागले पाहिजेल तसेच बंदिस्त जलवाहिनीला असलेला विरोध कायम राहील. यासाठी कितीही मोठा लढा द्यावा लागला, तरी सर्व धरणग्रस्त शेतकरी एकजुटीने लढण्यास तयार असल्याचा निर्धार टाकवे बुद्रुक भैरवनाथ मंदिरात झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बंदिस्त जलवाहिनीमुळे परिसरातील गावांच्या पाणीपुरवठ्यावर, बागायती क्षेत्रावर तसेच विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. आंध्रा धरणाची निर्मिती कोणत्या उद्देशाने झाली आणि स्थानिक गावांच्या पाण्याच्या गरजांचा विचार न करता शहरांसाठी पाणी नेण्याचे नियोजन का केले जात आहे, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
या मागण्यांसाठी येत्या २२ तारखेला मावळ तहसील कार्यालयात व मावळचे आमदार सुनिल शेळके यांना निवेदन देण्यात येणार आहे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन, योग्य मोबदला, रोजगार आणि स्थानिक गावांच्या पाण्याची हमी याबाबत ठोस निर्णय घ्यावा. धरणग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत बंदिस्त जलवाहिनीची योजना कायमस्वरूपी स्थगित करावी, अशी भूमिका बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी मांडली.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– “भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले
– “स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम
– मावळ तालुक्यात महायुतीत पुन्हा जुंपली
