Dainik Maval News : कुसवली गावातून वहानगाव येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी दररोज तीन किलोमीटर पायी येणाऱ्या मुलींची पायपीट आता थांबणार आहे. लायन्स क्लब ऑफ पुणे मेट्रोपॉलीस, युनियन बँक ऑफ इंडिया आणि मराठी पत्रकार संघ, मावळ तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने कुसवली येथील पंधरा मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे मुलींचा शाळेत येण्या-जाण्याचा प्रवास सुलभ झाला असून, त्यांनी आनंद व्यक्त केला. याच कार्यक्रमांतर्गत भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तर नॅशनल सायकल वर्ल्डचे मालक समीर बाफना यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य देण्यात आले.
मुलींच्या शिक्षणातील अडचणी दूर करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कुसवली येथून वहानगावच्या भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना दररोज तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. सायकली मिळाल्यामुळे त्यांचा वेळ आणि श्रम वाचणार असून, शाळेत येण्या-जाण्याचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.
लायन्स क्लब ऑफ पुणे मेट्रोपॉलीसचे अध्यक्ष ॲड. मिलिंद रणदिवे म्हणाले, “आज या मुलींना शिक्षणासाठी मदत करता येत आहे, हे आमच्या जीवनातील सर्वांत मोठे समाधान आहे. मुली शिक्षणात पुढे जात आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो.”
लायन्स क्लबचे सायकल नियोजन चेअरपर्सन भरत इंगवले म्हणाले, “मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे. शिक्षणामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल आणि समाजात त्यांची ओळख निर्माण होईल. आज या सायकलींमुळे त्यांना शाळेत येणे सोयीचे झाले असून, त्यांची पायपीट थांबली आहे. मुलींना शिक्षणाच्या मार्गावर स्थिरता मिळताना पाहणे अत्यंत समाधानकारक आहे.”
युनियन बँक ऑफ इंडियाचे रिजनल हेड पार्थ सारथी मिश्रा म्हणाले, “सामाजिक कार्यात युनियन बँक कायम पुढाकार घेत असते. मुलींना शिक्षणासाठी मदत करणे म्हणजे समाजाच्या प्रगतीला हातभार लावणे होय. या सायकलींमुळे त्यांच्या शाळेत येण्यास सोय होईल आणि पायपीट थांबेल, हे अत्यंत समाधानाचे आहे. मुली मिळालेल्या सायकलींचा योग्य उपयोग करतील, याची खात्री आहे.”
बँकेचे मॅनेजर पवनकुमार शुक्ला म्हणाले, “शिक्षणासाठी हा उपक्रम स्तुत्य आहे. मुलींना सुरक्षित आणि सोयीस्कर मार्गाने शाळेत येण्याची संधी मिळाली आहे. हीच खरी समाजसेवा आणि प्रगती आहे. समाजातील प्रत्येकाने अशा उपक्रमांना पाठिंबा द्यावा.”
या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ पुणे मेट्रोपॉलीसचे अध्यक्ष ॲड. मिलिंद रणदिवे, सचिव ज्ञानेश्वर गायकवाड, खजिनदार श्रीकांत रेवणणवर, सायकल नियोजन चेअरपर्सन भरत इंगवले, युनियन बँकेचे रिजनल हेड पार्थ सारथी मिश्रा, मॅनेजर पवनकुमार शुक्ला, मनिषकुमार, संदीपकुमार, शंकर गुप्ता, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष रामचंद्र माने, मैत्री आधार सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र टकले, फोटोग्राफर राजू गराडे, मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुदेश गिरमे, अध्यक्ष रामदास वाडेकर, सहसचिव विशाल कुंभार आणि सदस्य ज्ञानेश्वर वाघमारे उपस्थित होते.
कुसवली गावातील युवा उद्योजक रमेशनाना शिंदे, सरपंच चंद्रभागा दाते, पै. किरण शिंदे, दशरथ वारे, अर्चना चिमटे, शारदा चिमटे, विकास ढमाले, आशा मदगे, मंगेश चिमटे, पै. नाथा चिमटे, उल्हास चिमटे, ग्रामपंचायत कर्मचारी दत्ता चिमटे, काशिनाथ वाडेकर, शीतल अविनाश भालेराव, रविंद्र चिमटे, आशाबाई शिंदे, मंदा शेलार, विष्णू चिमटे आणि सुमन डोळस यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत इंगवले यांनी केले. सूत्रसंचालन रमेश शिंदे यांनी केले, तर गणेश विनोदे यांनी आभार मानले. सायकली मिळाल्यामुळे दररोजची पायपीट थांबणार असल्याने मुलींनी मनापासून समाधान व्यक्त केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा
– आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!
– वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त
– घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू
– दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक
