Dainik Maval News : अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत, अन्न सुरक्षा व मानके (परवाना व नोंदणी) नियमन, २०११ मधील अनुसूची ४ मधील सूचनांनुसार शाकाहारी व मांसाहारी पदार्थाची तयारी, प्रक्रिया, शिजवणे वेगळी असावी. शाकाहारी अन्नपदार्थाची मांसाहारी अन्नपदार्थापासून प्रक्रियात्मक व साठवणीच्या टप्प्यावर स्पष्टपणे वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या अन्न सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या अन्न व्यावसायिकांवर परवाना रद्द, दंड आकारणे किंवा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कळविले आहे. सर्व अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षेबाबत असलेल्या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत गतवर्षी राज्यातील ३० हजार अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे, तर या वर्षी एक लाख अन्न व्यवसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
- अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर बाब नसून ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची सामाजिक जबाबदारी आहे. नियमांच्या पालनात दोषी अन्न आस्थापनाना त्वरित नोटीस, कारवाई व आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी कळविले आहे.
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र आणि भारतीय अन्न व सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नसुरक्षा व प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यभर विविध प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा व जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनात एकूण नवीन १८९ अन्न सुरक्षा अधिकारी ७ जून २०२५ रोजी रुजू झालेले असल्याने अन्न आस्थापना तपासणी संख्या निश्चितच वाढणार आहे.
- राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व उपाहारगृहांमध्ये नियमित तपासण्या केल्या जात असून तपासणीत दोषी आढळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल.
अन्न भेसळीसंदर्भात नागरिकांनीही हेल्पलाइन किंवा Food Safety Connect App च्या माध्यमातून तक्रार नोंदवावी. अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी आपले नजीकचे अन्न व औषध प्रशासन कार्यालय किंवा https://fda.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असेही आयुक्त नार्वेकर यांनी कळविले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभ ; मावळ तालुक्यातील 24 शाळांचा समावेश
– केंद्र सरकारने पोल्ट्री व्यवसायासाठी बनविलेली नियमावली महाराष्ट्रात तातडीने लागू करा ; मावळ पोल्ट्री संघटनेचे निवेदन
– देहूरोड खून प्रकरणातील आरोपीला 24 तासात अटक ; पोलिसांनी गुजरातच्या वडोदरातून घेतले ताब्यात । Maval Crime
– विकसित कृषी संकल्प अभियान : मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन । Maval News