Dainik Maval News : मावळ तालुका भूमिअभिलेख कार्यालयातील प्रमुख असलेले उपअधीक्षक पदासह शिरस्तेदार, मुख्यालय सहाय्यक आणि छाननी लिपिक अशा चार प्रमुख पदांवर गेल्या दोन महिन्यांपासून मूळ अधिकारी नसल्याने प्रभारी अधिकारी कार्यालयाचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे या कार्यालयातील अनेक कामे प्रलंबित असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
भूमिअभिलेख कार्यालयाच्या प्रमुख अधिकारी असलेल्या उपअधीक्षक पल्लवी पाटील यांच्यावर 25 जानेवारीदरम्यान निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे रिक्त झालेल्या उपअधीक्षक पदाचा कार्यभार खेड तालुक्याचे उपाधीक्षक नितीन सूर्यवंशी यांच्यावर सोपवण्यात आला आहे.
तसेच जवळपास तीन महिन्यांपूर्वी शिरस्तेदार म्हणून कार्यरत असलेले सचिन गवारी यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रभारी म्हणून याच कार्यालयातील निमतानदार एस. पी. बारभाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच मुख्यालय सहाय्यक चिंतामण मोरे यांची बदली झाल्याने लोणावळा येथील नगर भूमापन अधिकारी अमोल वाव्हळ यांच्याकडे मुख्यालय सहाय्यक पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. याशिवाय छाननी लिपिक असलेले सागर धादवड यांची बदली झाल्याने त्यांचा कार्यभार भूकरमापक युसुफ शेख यांच्याकडे देण्यात आला आहे.
एकंदरीत उपअधीक्षक, शिरस्तेदार, मुख्यालय सहाय्यक व छाननी लिपिक ही चार प्रमुख पदे रिक्त असून चारही पदांवर प्रभारी अधिकारी नेमण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने भूमिअभिलेख कार्यालयातील कामकाज हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. असे असताना याच कार्यालयातील प्रमुख चार पदे रिक्त असून, प्रभारी अधिकारी त्यांच्याकडे असलेला मूळ जबाबदारी व्यतिरिक्त हा अतिरिक्त कारभार पाहत असल्याने अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे सबंधित पदांवर तत्काळ मूळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
रिक्त असलेल्या पदांवर प्रभारी असलेले अधिकारी
1. उपअधीक्षक मावळ – नितीन सूर्यवंशी, उपअधीक्षक खेड (अतिरिक्त कार्यभार)
2. शिरस्तेदार – एस.पी. बारभाई, निमतानदार (प्रभारी)
3. मुख्यालय सहाय्यक – अमोल वाव्हळ, लोणावळा भूमापन अधिकारी (प्रभारी)
4. छाननी लिपिक – युसुफ शेख, भूकरमापक (प्रभारी)
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना, सर्व शाळांमध्ये प्रमुख योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित केले जावे – शालेय शिक्षण मंत्री
– ड्रग्सच्या साखळीत सहभागी असणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई , संबंधितांची मालमत्ता जप्त केली जाणार – मुख्यमंत्री
– श्रीक्षेत्र देहू येथे संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पाणी वापराबाबत प्रतिबंधात्मक आदेश लागू
– तळेगाव दाभाडेतील नागरिकांचे ‘हक्काच्या घराचे स्वप्न’ होणार साकार ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
