Dainik Maval News : उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी चाकण येथे येऊन येथील वाहतूक कोंडी व वाढलेल्या अतिक्रमणाचा आढावा घेतला होता. त्यावेळी रस्ते विकासासाठी अतिक्रमणे हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यास अनुसरून आता पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए कडून येथील अतिक्रमण विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
चाकण एमआयडीसीसह परिसरातील नागरी समस्या आणि वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून बुधवारपासून (दि. १०) नगरपरिषद, एनएचएआयकडून पोलीस बंदोबस्तात या भागातील ४० अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली आहे. तशीच ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे यावेळी यंत्रणेने स्पष्ट केले.
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी चाकण एमआयडीसीसह शहर परिसरातील अनाधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणावर कारवाईच्या अनुषंगाने संबंधित प्रशासकीय यंत्रणेची बैठक घेऊन याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार संबंधित कारवाई पुणे-नाशिक महामार्गावर चाकण- तळेगाव चौक, आंबेठाण चौक ते एकतानगर रस्त्याच्या एका बाजूने करण्यात आली असून सुमारे ४० अतिक्रमणे काढण्यात आली.
दरम्यान या रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपल्या अतिक्रमणे काढून घ्यावी, अशा आशयाच्या नोटीसा पूर्वीच बजावण्यात आल्या होत्या. मात्र याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारपासून अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबवण्यात येत आहे. या कारवाईमुळे संबंधित भागातील रहदारी सुरळीत होण्यास मदत होणार असून पुणे- नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूने प्रत्येकी साडेबावीस मीटरच्या आतील अतिक्रमणे काढण्यात येत आहे.
यावेळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे सह कार्यकारी अभियंता दिलीप शिंदे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे रवींद्र रांजणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथकातील कर्मचारी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– वडगाव मावळ न्यायालयासाठी मंजूर १०९ कोटी निधीतून भव्य इमारत उभारण्याचा निर्णय ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थित बैठक संपन्न
– गाडीची पीयूसी सोबत नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नाही? पाहा काय आहे सरकारचे नवीन धोरण । No PUC No Fuel Initiative
– शेतकऱ्यांनो.. तुमच्या खात्यात पैसे आले का चेक करा ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’चा सातवा हप्ता वितरित