Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध महत्त्वाच्या विषयांवर परखड मते मांडली. मावळ मतदारसंघातील रस्ते विकास, आरोग्य सुविधा, सरकारी योजनांची अमंलबजावणी आणि उद्योग क्षेत्रातील समस्या यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले.
आमदार शेळके यांनी स्पष्ट केले की, गेल्या १५ वर्षांपासून रखडलेला रस्ते विकासाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. अनेक उद्योगपती, स्थानिक नागरिकांनी या कामाचे कौतुक करत सरकारचे आभार मानले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध योजनांतर्गत रस्ते बांधले जात आहेत. मात्र, या रस्त्यांची गुणवत्ता टिकाऊ असली पाहिजे. काही रस्त्यांचे काम होताच ते वर्षभरातच खराब होतात, रस्ते खड्ड्यांनी भरतात. ठेकेदारांना जबाबदारीने काम करायला लावण्याची गरज आहे. तसे न करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई केली पाहिजे. “रस्ता किमान पाच वर्षे टिकला पाहिजे, अन्यथा संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच, जो ठेकेदार वेळेत दर्जेदार काम करेल, त्याला प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी ३८२७ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले. “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” या भावनेतून सरकार आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. मावळ मतदारसंघातील कान्हे रोड येथील सरकारी हॉस्पिटल अंतिम टप्प्यात असून, तिथे लवकरच डॉक्टरांची भरती होणार आहे.
त्याचबरोबर, मुख्यमंत्री सहायता निधी गरीब रुग्णांसाठी तारणहार ठरत आहे. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांवर आळा घालण्याची गरज आहे. अनेक रुग्णालये अचानक बिल वाढवतात, नातेवाईकांना योग्य माहिती दिली जात नाही. त्यामुळे, “जर रुग्ण वाचला, तर सरकार त्याचे पूर्ण बिल भरेल आणि जर तो दैवयोगाने दगावला, तर त्याचे संपूर्ण बिल माफ झाले पाहिजे”, असे ते म्हणाले.
महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. मावळ मतदारसंघातील ९४,३६१ महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे. काही विरोधकांनी ही योजना फसवी असल्याचे म्हटले होते, मात्र आज महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत असल्याने ती निव्वळ आश्वासन न राहता वास्तवात अंमलात आलेली योजना आहे.
उद्योग क्षेत्रात वाढ व्हावी आणि युवकांना रोजगार मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, काही कंपन्या बंद झाल्यावर त्याठिकाणी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नव्या कंपनीत नोकरीवर घेतले जात नाही. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच, निगडी-आंबळे-कल्हाट परिसरातील इको सेन्सिटिव्ह झोनमधील अडथळे दूर करून तिथे उद्योग सुरू होण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
आमदार शेळके यांनी शेवटी राज्य सरकारच्या कामकाजाचे आणि अर्थसंकल्पाचे कौतुक केले. त्यांनी अर्थसंकल्पाला जाहीर पाठिंबा देत, “या सरकारने विकासकामांसाठी ज्या पद्धतीने भरीव तरतूद केली आहे, ती कौतुकास्पद असून जनतेच्या हितासाठी शासनाने आणखी प्रयत्न करावेत”, असे मत आमदार सुनील शेळके व्यक्त केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडणूक : छाननीत पाच अर्ज बाद, 195 अर्ज वैध
– मावळात जेई लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्धार ; 1 वर्षे ते 15 वर्षे वयोगटातील बालकांचे केले जाणार लसीकरण । Maval News
– मावळातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ‘ती’ चार ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास जोडण्यास गृह विभागाचा नकार ? । Maval News