केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विभागाने पारंपरिक काम करणाऱ्या बलुतेदार कारागिरांसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली असून जिल्ह्यातील बलुतेदार कारागिरांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामाद्योग कार्यालयाने केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
ग्रामीण व शहरी पारंपरिक बलुतेदार कारागिरांच्या उद्योगास स्थैर्य निर्माण करणे, त्यांना व्यवसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिक मदत, नाममुद्रा प्रचार (ब्रँड प्रमोशन) आणि बाजारपेठ जोडणीसाठी (मार्केट लिंकेज) व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी पारंपरिक बलुतेदार कारागिरांना ५ टक्के व्याजदरात विना तारण ३ लाखापर्यंत दोन टप्प्यात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ( Appeal to traditional Balutedar artisans to take advantage of Pradhan Mantri Vishwakarma Yojana )
प्रशिक्षण घेणाऱ्या कारागिरांना ५ दिवसीय मुलभूत प्रशिक्षण व १५ दिवसीय कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षण कालावधीत प्रति दिन ५०० रूपये विद्यावेतन दिले जाणार आहे. प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र प्रदान केले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कारागिरांना टूलकिट खरेदीसाठी १५ हजार रूपयांच्या पावत्यादेखील (व्हावचर्स) देण्यात येणार आहे.
- सुतार, लोहार, सोनार (दागिने कारागीर), कुंभार, न्हावी, माळी (फुल कारागीर), धोबी, मूर्तीकार, टोपल्या, झाडू, बांबुच्या वस्तू बनवणारे, शिंपी, गवंडी, चर्मकार, अस्त्रकार, बोट बांधणारे, अवजारे बनवणारे, खेळणी बनविणारे, कुलूप बनविणारे व विनकर कामगार आदी पारंपरिक कारागीर या योजनेत समाविष्ट केले आहेत.
सदरची योजना संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत असून लाभार्थ्यांची नोंदणी आवश्यक आहे. लाभार्थ्याची नोंदणी सुक्ष्म व लघू व मध्यम उद्योग विभागाचे संकेतस्थळ, सामान्य सुविधा केंद्र (सीएससी), सेंटरवर व आपले सरकार सेवा केंद्र येथे विनामूल्य करण्याची सुविधा करण्यात आली आहे. लाभार्थी नोंदणीकरिता आधार, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, शिधापत्रिका, बँकेचे पासबुक, आधारकार्ड संलग्न मोबाईल क्रमांक आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.
लाभार्थीना मिळणारे लाभ थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. योजना राबविण्यासाठी कोणतीही त्रयस्थ व्यक्ती किंवा मध्यस्थ संस्थेची नेमणूक करण्यात आलेली नाही. कोणत्याही मध्यस्थाच्या भूलथापांना किंवा अमिषाला लाभार्थ्यांनी बळी पडून त्याच्यासोबत आर्थिक व्यवहार करण्यात येऊ नयेत. या बाबतीत झटपट आर्थिक लाभाची आमिष दाखवून फसवणूक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्यांची राहील.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, २४ ब, जुना पुणे मुंबई रस्ता, शासकीय दूध डेअरी समोर, पुणे-३ येथे किंवा ई-मेल पत्ता dviopune@rediffmail.com वर संपर्क करावा, असेही जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सतीश खरात यांनी कळविले आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! आमदार शेळकेंचा मास्टरस्ट्रोक, तळेगाव नगरपरिषदेच्या वाढीव कर आकारणीला राज्य सरकारची स्थगिती । Talegaon Dabhade
– ‘रुडसेटी’ संस्थेमार्फत वराळे येथे बेसिक फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे मोफत प्रशिक्षण शिबिर, जाणून घ्या । Talegaon Dabhade
– संस्कृती फाऊंडेशन आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्याला मदतीचा हात !