Dainik Maval News : मावळसह संपूर्ण राज्यभरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. मावळ तालुक्यात तर दिवसेंदिवस निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारणाची रंगत आणखीन वाढत आहे. परंतु निवडणुकांचा आणि राजकारणाचा बाज हल्ली बदललेला दिसत आहे. खरेतर ‘स्थानिक’च्या निवडणुका ह्या सर्वसामान्यांच्या अगदी जवळच्या असतात, या निवडणुकांतून सामान्यांच्या प्रश्नांची, समस्यांची चर्चा होऊन त्या सोडविण्याची दिशा मिळणे अपेक्षित असते. परंतु सध्या मावळातील निवडणुकीचे वातावरण पाहता नागरिकांच्या समस्या, अडचणी यांची कुठेही चर्चा न होता, केवळ पैसा, मनोरंजनाचे कार्यक्रम अन् देवदर्शन याचीच चर्चा होताना दिसत आहे. मावळच्या भविष्याच्या दृष्टीने हे धोकादायक आहे.
मावळ तालुक्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक सोबत लोणावळा व तळेगाव दाभाडे या दोन नगरपरिषदांच्या निवडणुका आणि वडगाव नगरपंचायतीची निवडणुक होणार आहे. या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यासोबत इच्छुक उमेदवार देखील तयारीला लागले आहेत. काही इच्छुक उमेदवार तर गेली दोन तीन वर्षांपासून गण, गट अन् वॉर्डात तयारी करीत आहे. परंतु ही तयारी म्हणजे पैसा खर्च करणे अन् वेगवेगळ्या कार्यक्रमांतून मतदारांना आकर्षित करणे व जोडून ठेवणे इतकीच आहे. कुठलाही उमेदवार स्थानिक प्रश्न, समस्या यांची मांडणी करताना, ते सोडविण्यासाठीची चर्चा करताना किंवा त्यासाठी झगडताना दिसत नाही. आता तर निवडणुक टप्प्यात आल्यापासून गल्लोगल्ली उमेदवार समोर आले असून कुठलाही विचार, दिशा, धोरण समोर न ठेवता पैसा अन् कार्यक्रमांच्या जोरावर निवडणुक जिंकण्याची स्वप्न पाहत आहेत.
मावळ तालुक्यात अलीकडच्या काळात जणू हा पॅटर्न सेट झाला आहे. निवडणूक आली की पैसा फेकावा अन् पैशाच्या जोरावर मते मिळवावीत. लोकशाहीचा आत्मा म्हणजे निवडणुका अन् मतदार हा तर लोकशाहीचा राजा. परंतु राजाच बिघडू लागल्याने लोकशाही कुणी अन् कशी टिकवावी हाच खरा प्रश्न आहे. निव्वळ निवडणुका होणे आणि नवीन शासक येणे म्हणजे लोकशाही, असं नाही. तर निवडणुकीतून नागरिकांच्या प्रश्नांची, समस्यांची चर्चा व्हावी, त्या प्रश्नांची सोडवणूक करणारे नेतृत्व उदयास यावे आणि या नेतृत्वाला मतदारांनी साथ द्यावी, अशी ही व्यवस्था. परंतु हल्ली मतदार देखील उमेदवाराकडे बघताना किती विचारपूर्वक पाहतात हाच विचार करण्याचा घटक आहे. पूर्वी मतदार उमेदवाराला प्रश्न विचारायचे, त्याचे विचार – ध्येय जाणून घ्यायचे, पण हल्ली हे होताना दिसत नाही. पैठणीच्या आड सामान्यांचे प्रश्न अन् समस्या दोन्ही झाकल्याची जाणीव होत आहे, ही खरेतर धोक्याची घंटाच म्हणावी लागेल.
मतदार राजा जागा हो…
मावळ हा शहर आणि ग्रामीण भाग यांचे मिश्रण असलेला तालुका. यामुळे तालुक्यात वेगवेगळ्या भागातील प्रश्न, समस्या वेगळ्या आहेत. त्याची जाणीव स्थानिक मतदारांना सर्वाधिक असते. त्यामुळे खरेतर मतदारांनी जागरूक होऊन किमान निवडणुक काळात तरी समोर येणाऱ्या नेते, उमेदवार यांना स्थानिक प्रश्नांवर बोलते करणे गरजेचे आहे. याचाच अर्थ मतदारांनी उमेदवारांना प्रश्न विचारणे आवश्यक आहे. तेव्हाच कुठे योग्य उमेदवार निवडणुकीत उतरतील अन् तेच निवडून येतील. केवळ पैसा अन् पक्ष पाहून मतदान करणे हे कधीही धोक्याचेच. आपली लोकशाही ही व्यक्ती केंद्रीत आहे, त्यामुळे मतदारांनीही प्रत्येक उमेदवार अर्थात प्रत्येक व्यक्तीचा योग्य विचार करणे, हेच या निवडणुकीत अपेक्षित आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर शक्य नाही ; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
– मावळातील नुकसानग्रस्त भातउत्पादक शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या ; महाविकासआघाडीचे तहसीलदारांना निवेदन
– लाडक्या बहिणींनो… 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा…
– अवकाळीचा फेरा, भिजला भाताचा पेरा ! मावळातील नुकसानग्रस्त भात उत्पादकांना भरपाई देण्याची NCP ची मागणी


