Dainik Maval News : दहावी, बारावीच्या परीक्षा व शालांत परीक्षा संपत असताना उन्हाळी सुट्ट्या लागताच पालक मुलांसह सुटीसाठी घराबाहेर पडण्याचा प्लान करतात. अशात थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळा, कर्जत भागात सुट्ट्या एन्जॉय करण्याला प्राधान्य दिले जाते. बहुतेकवेळा पर्यटक ऑनलाईन बुकिंगला प्राधान्य देतात. परंतु अशा प्रकारे ऑनलाईन बुकिंग करताना पर्यटकांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याबद्दल एक रॅकेट उघडकीस आणले असून एकाला अटक केली आहे.
लोणावळा, तसेच कर्जतमध्ये व्हिला, रिसॉर्ट्स आणि हॉटेल्ससाठी ऑनलाइन बुकिंगचे आमिष दाखवून लोकांना फसविण्याच्या आरोपाखाली ओशिवरा पोलिसांनी एका तरुणाला नुकतीच अटक केली. आकाश रुपकुमार जाधवानी (वय 25) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो घाटकोपर येथील राहणारा आहे. या तरुणाला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. त्याच्यावर मलबार हिल, एलटी मार्ग, विलेपार्ले पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत.
- आरोपीने सोशल मीडिया आणि फसव्या वेबसाइट्सद्वारे लक्झरी निवासस्थानांसाठी आकर्षक डीलची जाहिरात करून पीडितांना आमिष दाखवले. एकदा पीडितांनी आगाऊ पैसे भरले की, तो बुकिंग न देता गायब व्हायचा, असे तपासात उघड झाले आहे. जानेवारीमध्ये एका 40 वर्षीय रिअल इस्टेट ब्रोकरने 42 हजार रुपये गमावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
कर्जत, खोपोली, लोणावळा येथे कुटुंब, मित्रांसह सुट्टी घालवण्याची योजना आखत असलेल्या तक्रारदाराला इंस्टाग्रामवर एक जाहिरात दिसली. त्याने लिंकवर क्लिक केल्यानंतर व्हॉट्सॲप संपर्क क्रमांक मिळवत एजंटशी संभाषण सुरू केले. आरोपीने 16 ते 18 मार्चदरम्यान लोणावळा येथे मुक्कामासाठी 18 सदस्यांच्या गटासाठी 85 हजारांचे पॅकेज देऊ केले. त्याने 42,000 रुपयांची आगाऊ रक्कम मागितली, जी तक्रारदाराने त्याच्या बँक खात्यातून ट्रान्सफर केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
ट्रॅव्हल ग्रुपमधील सदस्यांनी तक्रारदाराला ट्रॅव्हल कंपनीच्या खराब प्रतिष्ठेबद्दल सांगितले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने, त्याने बुकिंग रद्द करण्यासाठी एजंटशी संपर्क साधत परतफेड करण्याची विनंती केली. एजंटशी संपर्क न झाल्याने तक्रारदाराने ओशिवरा पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. जाधवानी हा पेइंग गेस्टमध्ये राहायचा. त्या पत्त्याचा वापर बँक खाती उघडण्यासाठी करायचा. अखेर सायबर पोलीस पथकाने त्याला अटक केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महसूल विभागाकडून ‘जिवंत सातबारा मोहीम’ जाहीर : 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार
– वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार ; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती
– घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार मोफत वाळू देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा